गावागावांत होणार श्‍वानांची नोंदणी

0

पशुसंवर्धन विभागाकडून होणार सर्वेक्षण

अहमदनगर (प्रतिनिधी)- भटक्या श्‍वानांची वाढलेली संख्या आणि यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरांप्रमाणेच आता गावागावांतील श्‍वानांची नोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.
कुत्र्यांमुळे निर्माण होणार्‍या वाढत्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरून श्‍वानांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी, रेबिज निर्मूलनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची सभाही झाली. त्यात भटक्या श्‍वानांचे सर्वेक्षण करण्यााठी विहीत नमुना तयार करून तो सर्व ग्रामपंचायतींना पाठविण्याचे अध्यक्षांनी सूचित केले होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे डॉ. तुंबारे यांनी सांगितले.

पाळीव कुत्र्यांच्या नोंदणीसाठी अर्जाचा नमुना तयार करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी नोंदवही ठेवायची आहे. त्यात एखाद्या श्‍वान मालकाने जर नोंदणीसाठी अर्ज केला तर त्याबाबत नोंदणी करून त्याला त्या क्रमांकाचा बिल्ला द्यावयाचा आहे. तो बिल्ला श्‍वान मालकाने श्‍वानाच्या गळ्यात बांधायचा आहे. ज्यावेळी श्‍वान पकडण्याचे काम बाहेरच्या संस्थेला दिले जाईल तेव्हा त्यांची माणसं श्‍वान पकडण्यास जातील तेव्हा या बिल्ल्याचा उपयोग होईल. ज्याला बिल्ला असेल ते श्‍वान पाळीव असल्याने त्याला पकडण्यात येणार नाही. असा या नोंदणी व बिल्ला देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. भटके श्‍वान पकडून लसीकरण करणे, नसबंदी करणे अशी कामे केली जाणार आहेत. सर्वेक्षणाचे काम पशुसंवर्धन विभाग अथवा एखादी संस्थेकडून करून घ्यावे लागणार आहे. पशुगणना पुढच्या महिन्यात अपेक्षित आहे. त्यात पाळीव आणि भटके श्‍वान किती आहेत हे निश्‍चित होईल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*