खासगी कृत्रिम रेतन करणार्‍यांना नोंदणी बंधनकारक

0

महिन्याला माहिती सादर करावी लागणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – खासगीत कृत्रिम रेतन करणार्‍या पशुवैद्यकांना आता जिल्हास्तरावर नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर खासगी कृत्रिम रेतन करणार्‍यांनी नोंदणी न करताच कृत्रिम रेतनाची सेवा सुरू ठेवल्यास त्यांच्यावर त्यांच्या भारतीय दंड विधान 1860 च्या कलम 188 अन्यव कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश पशूसंवर्धन विभागाचे आयुक्त यांनी काढले आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांत व्यतिरिक्त कृत्रिम रेतन करणार्‍या खासगी पशुवैद्यकांची संख्या नेमकी किती आहे. याबाबत पशूसंवर्धन विभागात मतभिन्नता आहे. यापूर्वी खासगी पशूवैद्यकीय सेवा देणार्‍यांची नोंदणी करण्यात येत होती. मात्र, 2001 नंतर जनावरे व्यवस्थान अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांनी थेट कृत्रिम रेतनाला सुरूवात केली. यासह काही लोकांनी जनांवर खासगी औषध उपचार केल्याने या जनावरांच्या या मुन्नाभाईवर नियंत्रण कोणाचे असा प्रश्‍न होता.

दोन वर्षापूर्वी नगर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रश्‍न चांगलाच गाजला होता. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पशुपालकांची विनापरवानगी कृत्रिम रेतन करणार्‍यांकडून फसवणूक केली जात असल्याचे त्यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्यात खासगी कृत्रिम रेतन आणि औषध उपचार करणार्‍यांची नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी घेण्यात आलेल्या माहिती जिल्ह्यात कृत्रिम रेतन करणार्‍यांची संख्या दीड हजारांच्या जवळपास असल्याचे समोर आले होते.

मात्र, हा आकडा खरा नव्हता. अशी परिस्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यात होती.
यामुळे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने हा विषय गांभिर्याने घेतला असून खासगी कृत्रिम रेतन करणार्‍यांना जिल्हास्तरावर नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.आता खासगी कृत्रिम रेतन करणार्‍यांना केवळ नोंदणीच नाही तर, महिनाभरात केलेल्या कामाचा अहवाल सादर करावा लागणार आहे.

संबधिताना नोंदणी करताना राज्याच्या पशुपैदास धोरणाप्रमाणे कृत्रिम रेतन कार्य करुन शासननिर्णयानूसार पशुपालकांना दर्जेदार कृत्रिम रेतन सुविधा देवून शास्त्रीय पध्दतीचे काटेकोरपणे पालन करणे, तसेच कृत्रिम रेतन नोंदी ठेवून दर महिन्याला 5 तारखेपर्यत सदर अहवाल सादर करणे, शासन धोरणानूसार सी.एम.यु प्रमाणित संस्थेकडील वीर्यमात्रा खरेदी करुन त्याचा तपशील मासिक अहवालात सादर करावा लागणार आहे. तसेच दर तीन वर्षानी पुन्हा नोंदणी करेण आदी अटी व शर्ती पशूसंवर्धन आयुक्तांनी जाहीर केल्या आहेत.

कृत्रिम रेतनची निश्‍चित माहिती मिळणार –
खासगी पशुवैद्यकांची नोंदणी सदोष असल्याने जिल्ह्यात किती जनावरांचे कृत्रिम रेतन करण्यात येते याची अद्यावत माहिती मिळत नव्हती. जिल्ह्यात झेडपीचे 223 व राज्यपशुसंवर्धनचे 7 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.या ठिकाणी होणार्‍या कृत्रिम रेतनाची माहिती उपलब्ध होत होती. मात्र, खासगी काम करणार्‍यांकडून मिळत नसल्याने जिल्ह्यात किती गायी, म्हशीचे कृत्रिम रेतन केली याची माहिती मिळत नव्हती. मात्र, आता प्रत्येक महिन्याला माहिती मिळणार असल्याचे सहाय्यक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ठवाळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*