नोंदणीकृत पशुसेवकांना करता येणार कृत्रिम रेतन

0

जिल्ह्यात 1280 कृत्रिम रेतन सेवक

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – या पुढे जिल्ह्यात राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी असणार्‍या पशुसेवक, खासगी पशु वैद्यकीय अधिकार्‍यांना कृत्रिम रेतन सेवा पुरविता येणार आहे. नोंदणी नसणार्‍या पशुसेवक, पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

 

सध्या राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागात तालुका निहाय कृत्रिम रेतन सेवा पुरविणार्‍यांची नोंदणी सुरू आहे. नोंदणी होऊन ओळखपत्र असणार्‍या पशुसेवक, खासगी पशु वैद्यकीय अधिकार्‍यांना कृत्रिम रेतन सेवा पुरविता येणार आहे. शेतकर्‍यांच्या जनावरांना दर्जेदार कृत्रिम रेतन उपलब्ध व्हावे, त्यांच्यातील संक्रीकरणाचे प्रमाणात योग्य राहावे, यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. यासह ग्रामीण भागात अनधिकृतपणे पशु वैद्यकीय सेवा देणार्‍यांच्या विरोधात तक्रार आल्यास पशुसंवर्धन कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

जिल्ह्यात सध्या लाळ्या खुरकत रोगाचा उद्रेक झाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे. तातडीने लाळ्या खुरकत विरोधात लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, लसी शिल्लक नसल्याने तातडीने लसीची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पदावर डॉ. सुनील तुंबारे यांची बदली झाली आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी असणारे डॉ. तुंबारे हे सध्या बीड जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन अधिकारी पदावर कार्यरत होते. 4 महिन्यांपूर्वी नगर जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी भरत राठोड सेवानिवृत्त झाल्याने नगरची जागा रिक्त होती. त्या ठिकाणी तुंबारे यांची बदली झाली आहे.

LEAVE A REPLY

*