राजकीय नेते आत्मकेंद्रीत झालेत : यशवंतराव गडाख यांनी उलगडले साहित्य, राजकारण, समाजकारणाचे अंतरंग

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – राजकारण हे मनी, मसल्स पॉवर असलेल्या लोकांचा धंदा बनलेय. सोन्याच्या साखळ्या, हातात कडे घालून वाढदिवसाचे मोठ मोठे शुभेच्छा फलक लावायचे. हेच त्यांचे सामाजिक काम आहे. नेत्याचा मुलगा अठरा वर्षांचा झाला तरी त्याचा फलक लागतो. त्याच्या समाजाला काय फायदा? ही आजची राजकीय स्थिती आहे. राजकारणात निष्ठा, विचार असे काही उरलेच नाही. सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसर्‍या पक्षात कार्यकर्ते दिसतात.
या बेगडी वातावरणात प्रामाणिक कार्यकर्त्यांचा जीव गुदमरतो आहे. परंतु राजकीय नेत्यांनी याचा विचार करण्याची वेळ आली आहे. वेळीच उपाय शोधून चांगले पायंडे पाडले तर आराजक माजेल, अशा शब्दांत बदलत्या राजकीय स्थितीवर परखडपणे भाष्य करतानाच ज्येष्ठ नेते साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी आपल्या जीवनातील राजकीय पट तसेच साहित्यिक वाटचालीचा प्रवास उलगडून दाखवला. आपल्या वाचन वेडाविषयीही गडाख यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. आवडत्या नेत्याविषयी मते व्यक्त केली. कोणताही आडपडदा न ठेवता आपली संघर्ष कथा सांगितली.
अहमदनगर येथे मसापच्या सावेडी शाखेच्या वतीने आयोजित विभागीय साहित्य संमेलनातील दुसर्‍या दिवशी प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी गडाख यांची प्रकट मुलाखत घेतली. सकाळी लवकर ही मुलाखत असताना संमेलनस्थळावर मोठी गर्दी जमली होती. गडाख यांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी ही लोकांची मांदियाळी जमा झाली होती. गडाख सत्शील राजकीय नेते, संवेदनशील साहित्यिक म्हणून परिचित आहेत. मुलाखतीदरम्यान आज त्याचा प्रत्यय आला.
राजकीय जीवनावर भाष्य करताना गडाख म्हणाले की, आता प्रामाणिकपणाला शून्य किंमत असली तरी माझी वाटचाल मात्र, प्रामाणिकपणानेच सुरू झाली. तो काळ विचारांनी भारलेला होता. कार्यकर्ते सर्वस्व पणाला लावून सामाजिक कामात झोकून द्यायचे. युथ काँग्रेसमधून आमची राजकीय पायाभरणी झाली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, अण्णासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
मुळा सहकारी साखर कारखाना उभारणीचा संघर्षही त्यांनी नमूद केला. एकेक शेअर्स विकण्यासाठी पायपीट केली. लोकांनी अनेकवेळा अविश्‍वास दाखवला. एका पाटलाकडे शेअर्स घेण्याची विनंती करण्यासाठी तब्बल 37वेळा गेलो. काही लोकांनी मदत केल्यानेच हा कारखाना उभा राहिला. हा कारखाना परिसराचे विकासाचे केंद्र आहे.
राजकारणात पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार अशी पदे भूषविली. जीवनात अनेक चढउतार आले. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना काही लोकांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली. श्रेष्ठींनी राजीनामा मागितला. परंतु कशामुळे राजीनामा द्यायचा असा सवाल त्यावेळी बाणेदारपणे केला. जिल्हा परिषदेतील सदस्यांना विश्‍वासात घेऊन विचारा, त्यांना नको असेल तर मी राजीनामा देतो.
सर्व सदस्यांनी दोन तृतीयांश बहुमताने माझ्या बाजूने मतदान केले. कम्युनिस्ट पक्षाच्या सहा सदस्यांनीही माझी बाजू लावून धरली. त्यांना माझ्या कामाची पद्धत माहिती होती. राजीनामा दिला तरी मीच निवडून येईल, असे त्यांना ठणकावून सांगितल्याची आठवणही गडाख यांनी आवर्जून सांंगितली.
शेतकरी आणि हमीदराबाबत भाष्य करताना गडाख म्हणाले की, शेतकर्‍यांचा कर्जबाजारीपणाचा प्रश्‍न आताचा नाही. आतापर्यंत अनेक सरकारे सत्तेत आली गेली. मात्र, शेतकर्‍यांच्या जीवनात काहीच बदल झाला नाही. कारण शेतकरी कधीच त्यांच्या केंद्रस्थानी राहिला नाही. शेतकर्‍यांची नवी पिढी शेती करीत नाही. कृषी क्षेत्रात क्रांती झाली पण त्याचा उपयोग शेतकर्‍यांना झाला नाही.
कौटुंबिक जीवनाचा पदर उलगडून दाखविताना त्यांनी मुलीचे रजिस्टर लग्न, सामूहिक विवाह सोहळ्यात स्वतःच्या मुलाचे लग्न लावून दिल्यानंतर नातेवाईकांकडून झालेली मानहानीची कहाणीही सांगितली. त्या काळात मराठा समाजात लग्नाबाबत ठाम मते होती. ती बदलणे म्हणजे जिकीरीचे काम होते. परंतु मुलीचे नोंदणी पद्धतीने लग्न लावून दिले. त्याचे अनेक कार्यकर्त्यांनी अनुकरण केले. ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे.
राजकारणातील काही वाईट गोष्टींवर भाष्य केले. त्यामुळे मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. वेळप्रसंगी पक्षही बदलावा लागला. परंतु राजकीय नेत्यांनी स्पष्ट बोलले पाहिजे. आपल्यातील माणूस मरणार असेल तर त्या पदांना काय किंमत असा सवालही गडाख यांनी उपस्थित केला.
साहित्यामुळे माणूस कळला. स्वतःचा वेध घेता आला. एक समाधानी आयुष्य जगण्यासाठी साहित्याची मोठी मदत झाली. शेक्सपिअर आवडतो, म्हणून त्याच्या गावात गेलो. जगभर भटकंती केली. परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांना टपरीवर गाडी उभी करून बोलण्याची सवय विसरलो नाही. कारण हे कार्यकर्तेच माझी दौलत आहे.

जेवणाचे ताट द्या, पाट नका देऊ –  राजकारणासोबतच समाजही बदलला आहे. पालक मुलांच्या नावावर सर्व संपत्ती करून देतात. एकदा सत्ता हातात आल्यावर मुले आई-वडिलांना विसरतात. त्यामुळेच वृध्दाश्रमांची संख्या वाढते आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता पालकांनी जेवणाचे ताट द्यावे परंतु बसायचा पाट देऊ नये, असा सल्लाही गडाख यांनी वडिलकीच्या नात्याने दिला.

 आवडते पुस्तक : पुतिन, आवडता चित्रपट : नटसम्राट  आणि बॉबी, आवडता नेता : यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी

—————- राजकारणात प्रामाणिकपणाचा त्रास  झाला. आणी-बाणी प्रारंभी आवडली पण नंतर त्रास वाटलानेत्यांचे ढोंग पटत नाही, निष्ठावंत कार्यकर्ता राहिला नाही, सरकारी निधीतील कामाची जाहिरात कशासाठी करता, राजकीय नेत्याने जाणीवपूर्वक चांगले पायंडे पाडावेत.

कृतार्थ जीवन  – आपल्याकडे पूर्वी वानप्रस्थ आश्रम होता. माणसाचे वय 60-70 झाले की तो वानप्रस्थ आश्रमात जायचा. सर्व गोष्टी विसरून जायच्या असतात. मीही तसेच करतो. तारूण्यात, राजकीय जीवनात काही लोकांचा त्रास झाला. काहींनी तो जाणीवपूर्वक दिला. त्या त्या वेळी त्यांचा रागही आला. परंतु आता मी सर्व विसरून गेलो आहे. राग, लोभ, द्वेष याच्या पलिकडे गेलो आहे.

कोणाबद्दल द्वेष, मत्सर ठेवला नाही – मी राजकीय विरोधकांकडे कधी शत्रुत्वाच्या भूमिकेतून पाहिलं नाही. राजकीय आणि साहित्यिकांशी संवाद साधनं अवघड असतं, मात्र दत्ता देशमुख, मोती भाऊ फिरोदिया, आबासाहेब निंबाळकर यांच्या संपर्कात मी आलो त्यामुळे माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष, मत्सर ही भावना ठेवली नाही.

LEAVE A REPLY

*