कवी संमेलनात श्रोते मंत्रमुग्ध

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- मसाप पुणे व सावेडी उपनगर शाखेच्यावतीने आयोजित पहिल्या विभागीय साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी आयोजित निमंत्रितांच्या कवी संमेलनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
जेष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवी संमेलनात प्रकाश होळकर, सुमती लांडे, बाबासाहेब सौदागर, गणेश मरकड, प्रा. शशिकांत शिंदे, वैशाली मोहिते, यशवंत पुलाटे, सुनील जवंजाळ, गणेश गायकवाड, अशोक शिंदे, संदीप काळे, दुर्गेश सोनार, संजय बोरुडे, अनिल गुंजाळ आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या. अंजली कुलकर्णी यांनी या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. प्रशांत गडाख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मसाप पुणेच्या दिपक करंदीकर यांच्या गजल ने या कविसंमेलनास प्रारंभ झाला. ‘आले न कुणी, गेले न कुणी, चाहूल तुझी छळतेच कशी’। ही गजल त्यांनी सादर केली.त्यानंतर कवी प्रकाश घोडके यांनी मगढूळल्या दाही दिशा, कडू झाली सारी वाणी। आता धुवून वापरा, घरी पावसाचे पाणी। ही कविता सादर केली.
सांगोल्याच्या सुनिल जवंजाळ यांनी कुठला चंद्र अन कुठल्या चांदण्या, रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या ही मिश्किल कविता सादर केली. प्रा. अशोक शिंदे यांनी हरवलेल्या गावाची व्यथा आणि कथा आपल्या कवितेतून व्यक्त केली. आपल्या कवितेतून ते म्हणतात मजुनं समदच कसं, बदलून गेलय राव, नव्या नवतीच्या जगात सगळं हरवून गेलय रावफ. वैशाली मोहिते यांनी एक स्त्रीवादी कविता सादर केली.
कोपरा या कवितेत त्या म्हणतात. सगळं घर निटनेटके जिथल्या तिथे लावल्यानंतर मीही राखून ठेवलाय माझ्यासाठी एक कोपरा. संजय बोरुडे यांनी देह झाला पंढरपूर, डोळ्याला चंद्रभागा, तुक्याच्या अभंगाला, देईना विठू जागा ही आगळी वेगळी कविता सादर केली. पंढरपूर येथून आलेल्या गणेश गायकवाड या नव्या दमाच्या कवीने, तमाशाचे फड खूप पाहिले, पण तुमची संसद जरा खास आहे.
गोरगरिबांचं कल्याण होईल, हा तर नुसताच भास आहे. ही सद्यस्थितीवर भाष्य करणारी बोलकी कविता सादर केली. कवी गणेश मरकड यांनी एका कवीचे मनोगत आपल्या कवितेतून व्यक्त केले.जगण्याच्या कोलाहलात भटकत आहे. एक कवी अनवाणी असहाय्य.
श्रीरामपूरचे चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी शृंगारलेल्या शिवारात मारू नको चकरा, गरठ्याच्या राती थांब सोबतीला पाखरा, कवी दुर्गेश सोनार यांनी हे तुझे येणे जसे की पावसाळ्या,आणि माझे तृप्त होणं चातकासारखे ही कविता सादर केली. पिंपळखुंट्याचे कवी नारायण सुमंत यांनी निळ्या वावरात दिंड्या आल्या वाजवीत टाळ, गर्जे आखाडी आभाळ, गर्जे आषाढी आभाळ, ही कविता गाऊन सादर केली.
कवियत्री सुमति लांडे यांनी, काल म्हटलेल्या आई बद्दल सांग पटकन दुपारच्या स्वप्नात, मला काही आठवत नव्हतं.आईबद्दल ही कविता सादर केली. कवी अनिल गुंजाळ यांनी यांनी रंग पांढरा नको, गोरी बायको हवी कशाला ही कविता सादर केली.संदीप काळे यांनी आवडलाच नाही तर चिडू नये फाडु नये, अलिप्ततेने सोडावा माणूस, रद्दी विकल्या सारखा पण… आवडलाच तर हृदयाच्या कपाटात जीवापाड जपावा माणूस, अगदी निवडक पुस्तका सारखा ही कविता सादर केली.
प्रा. शशिकांत शिंदे यांनी मसमर्पणफ ही कविता सादर केली. समजून घेण्याचे सारेच दरवाजे बंद केल्यानंतर किलकिल्ल्या होऊ लागतात. गैरसमजाच्या जुन्या खिडक्या. अंजली कुलकर्णी यांनी मजनगणनाफ ही कविता सादर केली. जगतांना जगणं कळणं अपरिहार्य नसतं, समोर येईल तसं तर सुचलं नसतं. ही कविता त्यांनी सादर केली. रामदास फुटाणे यांच्या 2 मिनिटे या कवितेने या कवी संमेलनाचा समारोप झाला.
काल रात्री 11 वाजून 52 मिनिटांनी माझ्या दारात एक सुंदर तरुणी आली, मीतील तीचे वय विचारले तेव्हा ती म्हणाली, तारुण्याला कुठे वय असते ? ही कविता त्यांनी सादर केली. मगरिबीफ चा वापर, साहित्यिक कवी, राजकारणी आणि चित्रपट निर्मात्यांनी केला आणि ते मोठे झाले पण गरिबी तशीच राहिली. स्वतःच्या कष्टावरच चांगले दिवस येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मसापच्या वतीने प्रशांत गडाख यांच्याहस्ते सहभागी कवींचा सत्कार करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*