आकृतिबंधानुसारच जिल्हा बँकेची भरती

0

अध्यक्ष गायकर, रिपाइंचे अशोक गायकवाड यांची संयुक्त माहिती : अनुकंपाधारकांचा सहानूभूतीपूर्वक विचार करणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा बँकेच्या रिक्त असणार्‍या 465 जागांसाठी 12 आणि 13 तारखेला नगर शहरातील 24 केंद्रांवर लेखी परीक्षा होणार आहे. नाबार्डच्या निर्देशानुसार बँकेने खासगी संस्थांमार्फत भरती प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून मंजूर आकृतिबंधानुसार ही भरती प्रक्रिया पार पडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर दिली.

तसेच 2004 पासून आतापर्यंत बँकेने एकाही अनुकंपा उमेदवाराला बँकेत समावून घेतले नसले तरी पुढील काळात अनुकंपा उमेदवारांबाबत सहानूभुतीपूर्वक विचार करण्यात येणार असल्याचे गायकर यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या भरतीबाबत रिपाइंचे अशोक गायकवाड यांनी आक्षेप घेतले होते. या सर्व आक्षेपाचे समाधान झाले असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा बँकेत गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष गायकर, रिपाइंचे गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राववसाहेब वर्पे, पर्सनल विभागाचे सरव्यवस्थापक किशोक भिंगार, भारत पाटील आदी यावेळी उपस्थित होते. सुरूवातीला बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती देण्यात आली. चालू वर्षी बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून ग्रॉस एनपीए 4.47 टक्के असल्याचे सांगण्यात आले. सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेचा बँकेला मोठा फटका बसला असून आतापर्यंत अवघी 42 टक्के वसुली झाली आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीत 82 टक्के वसुली झाली होती, अशी माहिती गायकर यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या 1 हजार 900 कर्मचार्‍यांचा आकृतिबंध मंजूर आहे. मात्र, सेवानिवृत्तीमुळे सध्या 1 हजार 300 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून बँकेच्या 288 शाखांचा कारभार हाकणे अवघड झाले आहे. यामुळे नाबार्डकडे पाठपुरावा केल्यानंतर भरतीला परवानगी मिळाली. नाबार्डने सूचविलेल्या चारपैकी पुण्याच्या नायबर या संस्थेला भरतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 465 जागांसाठी 17 हजार अर्ज आले असून बँकेत रिक्त असणार्‍या जातीच्या प्रवर्गानुसार ही भरती पार पाडण्यात येणार आहे. भरतीपूर्वी बँकेने कर्मचार्‍यांचे आकृतिबंध मंजूर केले असून 416 कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

बँकेच्या संचालक मंडळासमोर रोजंदारीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा पगार 200 रुपये रोज वरून 300 रुपये करण्याचा विषय ठेवण्यात येणार आहे. बँकेत सध्या कार्यरत असणार्‍या 57 कर्मचार्‍यांना बँकेच्या भरतीत वरिष्ठ पदासाठी परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. 2004 पासून अनुकंपातत्त्वावर नोकरीच्या प्रतीक्षेत असणारे 107 कर्मचारी आहेत. यातील अनेक कर्मचारी न्यायालयात गेलेले आहेत. या कर्मचार्‍यांची लवकरच बैठक घेऊन त्यांना बँकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शिपाई पदाच्या भरतीत या कर्मचार्‍यांना संधी देण्यात येईल असे अध्यक्ष गायकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

नाबार्डने अनुकंपा कर्मचार्‍यांना नोकरीत समावून घेण्याऐवजी त्यांना आर्थिक मोबादला देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे बँकेच्या माध्यमातून मयत कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला 15 लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे. कर्मचार्‍यांना आरक्षणानुसार रिक्त जागांवर पदोन्नती देण्यात येणार आहे. 2005-06 मध्ये सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त असणार्‍या जागा भरण्यात आल्या आहेत. 1989 आणि 1991 ला पदोन्नतीत डावलेल्या गेल्या कर्मचार्‍यांना मंजूर आकृतिबंधानुसार पदोन्नती देण्यात येणार असल्याचे गायकर यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या भरतीत लेखी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात येणार आहे. यासह संकेत स्थळावर परीक्षेची आन्सर की टाकण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी 12 आणि 13 ऑग्रस्टला मोठ्या संख्येने उमदेवार नगर शहरात येणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी पोलीस प्रशासन, एसटी महामंडळाची मदत घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*