Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यारोजगार संधीची आतषबाजी

रोजगार संधीची आतषबाजी

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi )यांनी ‘रोजगार मेळा’ ( Rojgar Mela )अंतर्गत भरती मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत 75 हजार युवकांना सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. याशिवाय 50 केंद्रीय मंत्र्यांनीही देशभरात विविध ठिकाणी 20 हजार लोकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. विविध शासकीय नोकर्‍यांसाठी निवड झालेल्या काही उमेदवारांना रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

- Advertisement -

सरकारी नोकर्‍यांसाठी निवडलेल्या उमेदवारांना पंतप्रधान मोदी आणि इतर मंत्र्यांनी नियुक्तीपत्रे दिली. त्याचवेळी उर्वरित उमेदवारांना इ-मेल किंवा पोस्टाद्वारे पाठवण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशात अधिकाधिक नोकर्‍या निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार अनेक आघाड्यांवर काम करत असल्याचे सांगितले.

कृषी, खासगी क्षेत्र आणि एमएसएमई यांसारख्या सर्वाधिक रोजगार केंद्रित क्षेत्रांवर भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी उज्ज्वल भविष्यासाठी भारतातील तरुणांना कौशल्य निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुद्रा योजनेअंतर्गत 20 लाख कोटी रुपयांची कर्जे यासारख्या विविध उपक्रमांनी प्रक्रिया पुढे नेली आहे. ते म्हणाले, यापूर्वी देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार कार्यक्रम कधीच लागू करण्यात आला नव्हता. उत्पादन आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रचंड रोजगार क्षमता असल्याने सरकार व्यापकपणे काम करत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून रोजगार निर्मितीच्या पैलूवर त्यांनी प्रकाश टाकला.स्थानिक पातळीवर तरुणांसाठी लाखो रोजगाराच्या संधी निर्माण करून विकासाची कामेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत,असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

तरुणांची भरती कुठे झाली?

या तरुणांना भारत सरकारच्या 38 मंत्रालयांमध्ये किंवा विभागांमध्ये नोकर्‍या देण्यात आल्या आहेत. या तरुणांना गट-अ आणि ब (राजपत्र), गट-ब (नॉन-राजपत्र) आणि गट-क श्रेणींमध्ये वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये नोकर्‍या मिळाल्या आहेत. केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, एमटीएस यासह विविध पदांवर भरती करण्यात आली आहे.

काँग्रेसची टीका

केंद्रातील मोदी सरकार 75 हजार जागांची नियुक्तीपत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. परंतु यातील अनेक जागांच्या परीक्षा दीड-दोन वर्षांपूर्वीच झालेल्या असून नियुत्या मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. आता हिमाचल प्रदेश, गुजरात आणि इतर निवडणुका होत असल्याने भाजपला निवडणुकीच्या तोंडावर तरुणांची आठवण झाल्याने नरेंद्र मोदी आणि भाजपने रोजगार मेळाव्याचा एक इव्हेंट केला आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शनिवारी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या