Friday, April 26, 2024
Homeजळगावजिल्ह्यात 61 जातींच्या 2902 पाणथळ पक्ष्यांची नोंद

जिल्ह्यात 61 जातींच्या 2902 पाणथळ पक्ष्यांची नोंद

जळगाव – 

जिल्ह्यात एशियन वॉटरबर्ड सेन्सस (एडब्ल्यूसी )अंतर्गत पाणथळ पक्षी गणना उपक्रम 10 जानेवारी ते 16 जानेवारी 2020 मध्ये जळगाव शहर व जिल्हापरिसरात पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी माहिती घेतली.

- Advertisement -

एरंडोल तालुक्यातील अंजनी, गणेश तांडा-खडके सीम, खडके खुर्द, पाचोरा तालुक्यात बहुळा धरण, जामनेर तालुक्यातील शहापूर, पिंपळगाव, वाकडी तसेच जळगावमधील वाघूर मन्यारखेडा, शिरसोली, मेहरूण हे तलाव आणि नदी काठी म्हणजे निमखेडी व गिरणा पंपिंग अशा 13 ग्रीड मध्ये गणना केली. या गणनेत 61 जातीचे एकूण 2902 पाणथळ पक्ष्यांची नोंद केल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

13 ग्रीडपैकी शाहपूर तलावावर सर्वात जास्त म्हणजे 37 जातीचे तर मेहरूण तलावावर सर्वात कमी म्हणजे फक्त 7 जातीचे पाणथळ पक्षी आढळले.एकूण संख्या शाहपूर येथे जास्त म्हणजे 485 तर आणि वाकडी तलाव जामनेर येथे सर्वात कमी म्हणजे 12 जातीचे मिळून फक्त 48 पक्ष्यांची नोंद झाली.या गणनेत वारकरी ( युराशियन कुट)- 612 त्या खालोखाल लहान पाणकावळा ( लिटील कर्मोरंट)-432 आणि शेकाट्या ( ब्ल्याकविंग स्टीलट)-222 या जातीचे पक्षी जास्त संख्याने आढळले.

खडके सीम तलावावर पोची(सॅडरलींग) हासमुद्र किनारी राहणार्‍या विदेशी पक्ष्याची नोंद झाली. तसेच क्वचित आणि संख्येने कमी दिसणारा रातबगळा (ब्लाक्क्राऊन नाईट हेरॉन )या पक्ष्यांचा खूप मोठा थवा खड्के खुर्द येथे एकाच जागी दिसला. निमखेडी गिरणा काठी पक्ष्यांची संख्या खूप घटली. येथे फक्त शेकाटे जास्त दिसून आले. नयनसरी-(कॉमन पोचार्ड), मोती लालसरी (रेड क्रेस्टेड पोचार्ड),चक्रांग बदक(ग्रीन विंग टील),थापट्या (नॉर्दर्न- शोवलर),नकट्या(नॉक्बील डक),दलदल हारीण (मार्श हरीअर), तलवार बदक (पिनटेल),ठिपकेवाली तुतारी( वुड सॅडपायपर),प्लवर, अशा हिवाळी देशी-विदेशी पाणथळ पक्षी दिसल्याचे गाडगीळ म्हणाले.

वैश्विक आंतरराष्ट्रीय पाणथळ पक्षी गणना ग्लोबल इंटर नॅशनल वॉटरबर्ड सेन्ससतर्फे 2017 मध्ये घेण्यात आली. दरवर्षी जानेवारी महिन्यात एशियन वॉटर बर्ड सेन्सस (एडब्ल्यूसी) करण्यात येते.या गणनेची सुरवात सन 1987 पासून झाली.या वर्षीची आशियाई पाणथळ पक्षी गणना 2020 मध्ये घेण्यात आली.

वैश्विक आंतरराष्ट्रीय पाणथळ पक्षी गणना एशियन वॉटरबर्ड सेन्सस अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल व पाचोरा तालुक्यात पाणथळ पक्षी गणना घेतल्याचे सांगून यावर्षी विदेशी व स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांनी फारच अल्प हजेरी लावली आहे. एकतर सर्वत्र पाणी व पुरेसे अन्न उपलब्ध असावे किंवा एकूणच हवामानाचा बदल तसेच पाणथळ जागांचे गाळ टाकी सारखे खोल खोद्ल्याचा परिणाम असावा, असे मत पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी व्यक्त केले.

यांचा होता उपक्रमात सहभाग

वराडसीम गणेश नगर तांडा येथील अनिल पोपट चव्हाण, दयाराम चव्हाण, प्रवीण राठोड, अक्षय चव्हाण वराडसीम, तसेच म. ध.पाटील माध्य.विद्यालय,खडकेसीम गणेश तांडा,एरंडोल येथील बबलू वंजारी,मनोज जोगी,भूपेंद्र जोगी,दिगंबर वंजारी,कृष्ण राठोड,रहेन्द्र नाईक,बाजीराव पाटील या विद्यार्थ्यांनी गणनेत सहभाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या