गरिबीची जाणीव करून देणारे ‘पवित्र रमजान पर्व’

0
(फारुक पठाण) | इस्लाम धर्मातील 12 महिन्यांपैकी 9 वा महिना म्हणजे ‘पवित्र रमजानुल मुबारक ’ हा महिना आहे. सर्व महिन्यांच्या तुलनेत सर्वात जास्त पुण्य या महिन्यात प्राप्त होते.
यामध्ये मुस्लिम बांधव पहाटेपासून सायंकाळपर्यंत सुमारे 15 तासांचा रोजा (उपवास) ठेवतात. तसेच या महिन्यात मोठ्या प्रमाणात इबादत करण्यात येते. दिवसभरातील पाच वेळेची फर्ज नमाजसह रात्री विशेष ‘तरावी’ ची नमाज देखील या महिन्यात पठण करण्यात येते.

रोजा ठेवणे प्रत्येक मुस्लिम महिला, पुरूषांना फर्ज (अनिवार्य) आहे. रमजान महिन्याला इस्लाम धर्मात विशेष महत्त्व आहे. या महिन्यात पवित्र कुरआन शरीफ उतरविण्यात आला. तसेच याच महिन्यात रोजे अनिवार्य (फर्ज) केले गेले. या महिन्याला अल्लाहतआला ने ‘माझा महिना’ म्हणून संबोधित केलाय. या महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांच्या पाच रात्रीमधून एक रात्र अशी आहे ज्याचे महत्व हजार महिन्यांच्या तुलनेतही जास्त आहे.

पैगंबर साहेबांनी ‘ जी व्यक्ती रमजानचे रोजे ठेवते, आपली श्रध्दा व विश्वास मजबूत ठेवून प्रत्येक कर्तव्याचे पालन करते त्या व्यक्तीचे मागील सर्व पाप धुतले जातात’ असे फर्माविले आहे. ‘रोजे’ ठेवतांना काही गोष्टींचे पालन प्रत्येक रोजेधारकाला करावे लागते. ‘रोजा’मुळे अध्यात्मिक शक्ती वाढते. सहनशीलता वाढीस ‘रोजा’ फार उपयोगी ठरतो. पहाटेपासून सुर्यास्तापर्यंत फक्त खान-पान न करणे, ‘रोजा’ नव्हे तर आपले प्रत्येक कर्म चांगले करून स्वतःला वाईट वृत्तीपासून दूर ठेवणेही रोजाचा महत्व आहे.

खोटेपणा, लबाडपणा, चोरी, त्रास देणे, धोका देणे इत्यादी कुकर्म केव्हाही करायला नकोत, तरीही वर्षाचे अकरा महिने हे कर्म चालत असतातच. रमजानमध्ये प्रत्येक मुस्लिम विशेषतः रोजाधारक अशा कुकर्मापासून फार दूर असतो. तसेच न सुटणार्‍या सवयींपासून एक रोजाधारक कमीत कमी दिवसभर तरी दूर राहतो.

ही फार मोठी गोष्ट आहे. काही लोकांचा असा गैरसमज आहे की रोजामध्ये काहीच न खाणे व पिणे हा आपल्या शरीरावर एक प्रकारचा अत्याचार आहे; परंतु हा पूर्णतः गैरसमज आहे. खरें म्हणजे विज्ञानानुसारसुध्दा रोजाला अप्रत्यक्षरित्या शरीरासाठी किंवा मनुष्यासाठी फार उपयुक्त व फायदेशीर ठरवण्यात आलंय. विज्ञानाच्या मते माणसाचे शरीर जेव्हा थकून जाते तेव्हा आपण विश्रांती घेतो.

आपण झोपेत असतांना शरीराचे बाह्यांंग म्हणजे हात, पाय, पाठ, डोळे, कान, डोकं, मान या सर्वांना विश्रांती मिळते हे खरे, परंतु आपल्या शरीरातील आतील भाग विशेषतः पोटातील पचनेंद्रीय व त्याला सहायक अंगाना विश्रांती मिळत नसते. ते 24 तास आपले कार्य करत असतात. अशा परिस्थितीत आपल्या पचनेद्रियांना विश्रांती देणे फार गरजेचे आहे, असे विज्ञान म्हणतो. यामुळे रोजाचे महत्त्व स्पष्ट होते. इस्लाम धर्म प्रभावी जीवन मार्ग आहे. यात शंकाच नाही. परंतु या जीवनमार्गावर सर्व मुस्लिम चालतातच असे नाही. जो कोणी मुस्लिम काहीही करतो, तोच इस्लाम धर्म, हे समजणे अत्यंत चुकीचे. कारण प्रत्येक धर्माच्या अनुयायांमध्ये काही दुष्ट व्यक्ती असतातच हे विसरून चालणार नाही. इस्लाम धर्म मानवता, सहिष्णुता, बंध्ाूभाव, देशप्रेम, सद्भावना, शांती आणि सभ्यतेची शिकवण देतो.

प्रत्येक मुस्लिम बांधव वर्षभर पवित्र रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. शाबान महिना संपला की पवित्र रमजान महिन्याचे चंद्र पाहण्यासाठी मुस्लिम अबालवृध्द उंचीच्या ठिकाणी गर्दी करतात, चंद्रदर्शन घडताच विशेष दुआ करतात, तसेच एकमेकांना चाँद मबारक म्हणत शुभेच्छा देतात. घरातील लहान मोठ्यांना सलाम करुन आशीर्वाद घेतात. पवित्र रमजान महिन्यात एक पुण्य कामाला सत्तर पुण्य कामाचा लाभ मिळतो. अधिकाअधिक कुरआन शरीफचे पठण करण्याबरोबर मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी मशिदीत जाताि तर महिलावर्ग घरात नमाज पठण करतात.

रमजान महिन्यात दिवसातील फर्ज पाच वेळेच्या नमाजसह रात्री इशाच्या नमाज नंतर ‘तरावी’ ची 20 रकात नमाज मशिदींमध्ये पठण करण्यात येते. तरावीच्या नमाजमध्ये पवित्र कुरआन शरीफचे वाचन करण्यात येते. यासाठी इस्लामी ‘हाफीज’ पदीधारक मौलानांची गरज राहते. ज्या मौलानांना पुर्ण कुरआन शरीफ तोंडीपाठ असते त्यांना ‘हाफीज’ म्हणतात. ज्या मशिदीत हाफीज मौलाना नसतो त्या मशिदीत एका महिन्यासाठी तरावीची नमाज पठण करण्यासाठी हाफीज पदवीधारक मौलानाची नेमणूक करावी लागते.

यासाठी शहरातील धार्मिक केंद्रात संपर्क केल्यावर अशा मौलाना उपलब्ध असतात. नाशिकमध्ये दारुल उलूम सादीकुल उलूम शाही मशिद व दारुल उलूम गौसे आझम या दोन मोठ्या मदरशांमधून देखील हाफीज पदवीधारक मौलानांची नेमणूक होते. रमजान महिना ‘बरकतवाला’ महिना म्हणून प्रसिध्द आहे. पूर्ण महिन्यात तीन भाग (खंड) असतात. पहिले दहा दिवस रहेमतचे तर दुसरे दहा दिवस मगफीरतचे तर शेवटचे दहा दिवस जहन्नमपासून (नजाअत) मुक्तीचे असतात, रमजान महिन्यातील प्रत्येक शुक्रवार (जुमा) ला विशेष महत्त्व आहे.

रमजान महिन्यात अल्लाहोतआलाची आपल्या भाविकावर विशेष कृपा असते. रमजानमध्ये सुमारे 15 तासांचा रोजा असतो, या काळात कोणत्याही प्रकारच्या खाण्यापिण्यावर बंदी आहे. या काळात गोरगरीब, गरजू लोकांचे जीवन कसे असते, याचा अहसास होतो. रमजान मध्ये जास्त प्रमाणात दया करण्याचे आदेश आहे. दुकानावरील कामगाराकडूनदेखील या महिन्यात जास्त काम न घेण्याची सूचना करण्यात आली आहे. इतरांना मदत करण्यासाठी देखील आदेश देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*