Friday, May 3, 2024
Homeराजकीयभ्रष्टाचाराची सर्व कागदपत्रे गोळा करण्यास सुरुवात

भ्रष्टाचाराची सर्व कागदपत्रे गोळा करण्यास सुरुवात

दोंडाईचा – Dondaicha – वि.प्र :

31 डिसेंबरपर्यंत काहींना तुरुंगाची हवा दाखवल्या शिवाय राहणार नाही. कारण भ्रष्टाचाराची सर्व कागदपत्रे गोळा करण्याचे काम पक्षाने माझ्यावर सोपविले आहे व ते काम सुरू झाले आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ. अनिल गोटे यांनी केले.

- Advertisement -

दोंडाईचा येथे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. त्या कार्यक्रमात श्री. गोटे हे बोलत होते. यावेळी प्रशांत भदाणे, माजी तालुकाध्यक्ष ललित वारुळे, म्हळसरचे माजी सरपंच कल्याण वारुडे, कपिल पाटील, विजय वाघ आदी उपस्थित होते.

ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे सचिव अमित पाटील, माजी नगराध्यक्ष गुलाबसिंग सोनवणे, माजी प्रभारी नगराध्यक्ष दिनेश चोळके, जब्बार बागवान, माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रतन भिल, माजी बांधकाम सभापती दिलीप पाटील, भूपेंद्र धनगर, कैलास वाडीले, असलमशॉ फकीर, माजी नगरसेवक रमेश बोरसे, नंदू सोनवणे, अशोक सोनवणे, गिरधारीलाल रामराख्या, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख, प्रदीप पारख, अजिज बागवान, माजी सभापती लक्ष्मीबाई सोनवणे, अनिता देशमुख, सुनंदा पाटील, उज्वला वाडीले, सरला बोरसे, नगरसेविका रेणुका सोनवणे, मिराबाई ठाकूर आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पुढे बोलतांना अनिल गोटे म्हणाले की, दोंडाईचात 3800 घरे बांधून वीस हजार लोकांची सोय केली. मात्र चांगले काम केले म्हणून तुरुंगात जावे लागले. यावर एकमेव उपाय म्हणजेच जनता होय.

दोंडाईचातील या घटनेचा लोकांना राग आहे आणि या रागाचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदान करून आपल्या रागाचा बदला घ्या असे आवाहन श्री. गोटे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील काहींचा डीएनए तपासण्याची गरज आहे. अशा जमातीला वठणीवर आणण्यासाठी मी दोंडाईचात आलो असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दगाबाज, लबाड व्यक्तिमत्व आहे.

गेल्या सत्तर वर्षात असे नेतृत्व आढळले नाही. केवळ लुटणे हेच काम त्यांनी केले. त्यांच्यात दोंडाईचाचा देखील समावेश होता असा टोलाही गोटे यांनी लगावला.

केंद्रातल्या मोदी सरकारवर देखील त्यांनी टीका केली. रिझर्व्ह बँकेच्या एक लक्ष 82 हजार कोटीवर डल्ला मारला. शिवाय नोटबंदीत चार कोटी लोकांना रोजगार बुडाला. अशीही टीका श्री. गोटे यांनी केली.

सिंचनाच्या प्रश्नालाही त्यांनी हात घातला. यासंदर्भात जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा होऊन त्यांनी त्वरित अहवाल मागितला असल्याने हा प्रश्नही लवकर निकाली काढण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

नानासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालिका ताब्यात द्या, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही व निधीचे ही उणीव भासू देणार नाही असे ही अनिल गोटे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण कार्यकर्त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी नेत्याची असते आणि ती मी घेतली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जर कोणी त्रास दिला तर मी सोडणार नाही असा इशारा गोटे यांनी दिला.

यावेळी अमित पाटील, प्रशांत भदाणे, नाजिम शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वीरेंद्र गोसावी, छोटू सांगळे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या