नाशिक जिल्ह्यातील या गावात आजही केली जाते रावणाची पूजा…वाचा सविस्तर

0

सुरगाणा (वाजीद शेख) |  काल सगळीकडे विजयादशमीनिमित्त ठिकठिकाणी रावण दहन करण्यात आले. मात्र नाशिक जिल्ह्यातील आणि सुरगाणा तालुक्यातील आदिवासी समाजाकडून ऊंबरपाडा (पि) येथे लंकापति रावणाची देवासमान पूजा अर्चा करण्यात आली. ही प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. 

 

आदिवासी समाज हा निसर्ग पूजक म्हणून समजला जातो. निसर्गात घडणाऱ्या घटनाकडे हा समाज दैवी शक्ती व चमत्कारिक दृष्टिने न पाहता शास्रशुद्ध पद्धतीने बघत असतो.

सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड पैकी ऊंबरपाडा (पि) या आदिवासी पाड्यावरील माजी सैनिक व मुखवटे (सोंगे) तयार करणारे कलाकार शिवा चौधरी हे आजही रामनवमी तसेच दस-याच्या दिवशी आवर्जून आदिवासी राजा लंकापति रावणाची पुजा अर्चा मनोभावे करतात.

आदिवासी भागात दरवर्षी होळी सणानंतर बोहाडा (भोवाडा) उत्सव मोठया ऊत्साहात साजरा केला जातो. यामध्ये रामायण, महाभारतातील सर्वच मुखवटे नाचविले जातात त्यामध्ये मानाचा रावणाची ताटी हे मुख्य आकर्षण असते.

रावणाची ताटी नाचविणे किंवा परिधान करणे म्हणजे मानाचे, प्रतिष्ठेचे मानले जाते. आदिवासी समाजात म्हण आहे की ‘भाताचे आवण विकेण पण रावण बांधेन’ याचा अर्थ रावणाच्या ताटीचा लिलाव हा सर्वात मोठया रकमेचा असतो तरी मी तो नाचविण्याकरीता मी ताटीचा लिलाव घेणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला जातो.

या बोहाडयात रावणाच्या ताटीची मिरवणूक काढण्यात येते. आदिवासी समाजात हजारों वर्षापासून हि बोहाडयाची परंपरा जोपासली आहे. गावातील अनिष्ट रूढी परंपरा, गावावर आलेले संकट दुर व्हावी म्हणून बोहाडयाचा नवस बोलला जातो.

शिवा चौधरी यांनी रावणाची ताटी जतन करून ठेवली आहे. यामध्ये पौराणिक सोंगे नाचविली जातात. आदिवासी बांधव लग्नात किंवा बोहाडयात रावणाच्या चाळयावर सुंदर हौसेने नाचकाम करतात.

या दिवशी रावणाची ताटीची मनोभावे पूजा केली जाते. एकीकडे रावणाचा दृष्ट समजले जाते. रावणाला वाईट गोष्टींचे प्रतिक मानले जाते मात्र आजही अतिदुर्गम भागातील ऊंबरपाडा (पि) या गावी आदिवासी समाजाकडून रावणापूजा केली जाते हे विशेष.

आदिवासी संस्कृती जगात श्रेष्ठ असून आमच्याकडे चोरी, खून, बलात्कार, फसवणूक, खोटे बोलणे, पर स्रीकडे वाईट नजरेने पाहिले जात नाही. थोरा मोठ्यांना मान सन्मान दिला जातो. रावणाने सीतेचे अपहरण करूनही मातेप्रमाणे सीतेचा सांभाळ केला होता. पुराण आजही साक्ष देत आहे असे शिवा चौधरी आवर्जून सांगतात.

LEAVE A REPLY

*