वृक्षतोडीविरोधात रवळजीचे ग्रामस्थ एकवटले; आंदोलनाचा इशारा

0
रवळजी | कळवण तालुक्यातील रवळजी येथे राखलेल्या जंगलातील कोरडे वृक्ष तोडणे व डहाळणीच्या नावाखाली हिरवेगार वृक्षांची बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या वनविकास महामंडळाच्या मोहिमेविरुध्द रवळजी ग्रामस्थांकडून प्रचंड विरोध होत आहे.

वनविभागाने रवळजी वनसंरक्षण समिती, ग्रामपंचायत यांच्या परवानगीशिवाय एक लाकुडही तोडु नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराच ग्रां.प सदस्य भास्कर भालेराव यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

रवळजी ग्रामस्थांनी परिसरात कुह्राड बंदी राबवत १० रुपये प्रमाणे प्रति माणसी वर्गणी गोळा करून जवळपास २०० हेक्टर पेक्षा जास्त जमिनीवर ‘मोठीदर’ भागात जंगल राखले आहे.

या जंगलावर लक्ष ठेवण्यासाठी गावाने सन-१९९२ सालापासून गावातीलच युवकांना रोजंदारीने जंगल संरक्षक (वाँचमन) म्हणून नेमले. वनविभाग अथवा वनविकास महामंडळाने संरक्षक यांच्या वेतनासाठी कुठलीच आर्थिक मदत केलेली नाही.

कळवण वनविभागाने रवळजी वासियांना चांगल्या प्रकारे जंगल राखल्यामुळे एक लाख रुपये रोख रक्कमेचे बक्षिस दिले होते. या रक्कमेतुन गांवकर्यानी मंदिर बांधकाम केले.

मात्र, नुकताच वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मोठी दर येथील जंगल गाठत विविध रंगाच्या मार्किग ( खुणा) करण्यास सुरूवात केली. जंगलातील कोरडे वृक्ष,ज्या झाडांची वाढ झालेली त्यांची डहाळणी करण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांना सांगण्यात आले. ग्रामस्थांची कुठलीही परवानगी न घेता जंगलतोड सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे.

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एकही वृक्ष तोङु नये अन्यथा रवळजी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, वनसंरक्षक समिती सदस्य, लहान मुले महिलांसह सर्व नागरिक जंगलातच ठिकाणी तीव्र आंदोलन छेडतील व कर्मचाऱ्यांना एक वृक्ष देखील तोडु देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

जंगलातील कोरडी वृक्ष जास्त वाढलेली वृक्ष यांच्या फांद्या डहाळणीच्या नावाखाली जंगलातील हिरवीगार सागवानी वृक्षतोड करुन नागपूर येथील मुख्य कार्यालयात नेण्याच्या नावाखाली लाकडाची तस्करी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे गावाने राखलेले जंगल उध्वस्त होऊ देणार नाही.या जंगालाचे काय करायचे हे गावच ठरवेल.
– भास्कर भालेराव, ग्रां.प सदस्य रवळजी

LEAVE A REPLY

*