रेशनची साखर पाच रुपयांनी महाग

दोन महिन्यांत दुसर्‍यांदा दरवाढ; जूनपासून अंमलबजावणी

0
नाशिक | दि. २६ प्रतिनिधी- ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणार्‍या राज्य सरकारने शिधापत्रिकेवरील साखरेचे दर प्रतिकिलो पाच रुपयाने वाढवत २० रुपये किलो करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमधील वाढ आणि वाहतुकीचे दर वाढवून देण्याची वाहतूकदार संघटनांनी केलेली मागणी यामुळे शासनाने ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

महिनाभरापूर्वीच रेशनवरील साखरेचे दर १३.५० रुपये प्रतिकिलो वरून १५ रुपये करण्यात आले. आता यात थेट पाच रुपये वाढ करण्यात आली आहे.  शहरी भागात १५ हजार रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या (अंत्योदय) आणि १५ ते ६९ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणार्‍या शिधापत्रिकाधारकांना दरमहा प्रतियुनिट (माणशी) पाचशे ग्रॅम साखर उपलब्ध करून दिली जाते.

ग्रामीण भागात १५ ते ४५ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणार्‍यांनाही प्रतियुनिट तेवढीच साखर दरमहा उपलब्ध करून दिली जाते. सणासुदीच्या काळात त्यामध्ये दीडशे ग्रॅमने वाढ करण्यात येते. केंद्र शासनाने एप्रिल महिन्यापासून साखरेवर दिली जाणारी सबसीडीचे अनुदान एका किलोसाठी १८ रुपये ५० पैसे ऐवढेच देण्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्य शासनाने रेशनवरील साखरेच्या दरातही वाढ केली आहे. एका किलो मागे तब्बल पाच रुपयांची वाढ झाली आहे.

त्याची अंमलबजावणी लागलीच पुढील महिन्यापासून जिल्ह्यात केली जाणार आहे. त्यामुळे साखर पात्र ग्राहकांना जून महिन्यापासूनच साखरेसाठी वाढीव पैसे द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकिकडे महागाई नियंत्रणात आणण्यात सरकार अपयशी ठरत असताना आता रेशनधारकांना मिळणार्‍या साखरेच्या दरातही वाढ करण्यात आल्याने गोरगरीब जनतेवर याचा बोजा पडणार आहे.

कार्डासाठी १ किलोच साखर
अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांना एका व्यक्तीसाठी महिन्याकाठी ५०० ग्रॅम साखर दिली जात होती. आता त्यात शासनाने बदल करत एका कुटुंबालाच अवघी १ किलो साखर महिन्याकाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
४ लाख लाभार्थ्यांना फटका
नाशिक जिल्ह्यात रेशनची साखर पात्र ४ लाख ८२ हजार ९७७ कार्डधारक आहे. त्यात १ लाख ७९ हजार ४०८ अंत्योदय आणि ३ लाख ३ हजार ५६९ बीपीएल कार्डधारक आहे. त्यांना ४ हजार ८२९ मेट्रीक टन साखर आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

*