POS मशीन न वापरणाऱ्या रेशन दुकानदारांना दणका; पुरवठा विभागाकडून नोटीसा

0
नाशिक । गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरीत करण्यासाठी 2600 पॉस (पीओएस – पॉईंट ऑफ सेल) मशीन बसविण्यात आली आहे.

धान्य खरेदी करणार्‍या ग्राहकांचे बायोमेट्रिक खात्री करूनच त्याला धान्य वितरीत करण्यात येणार आहे. परंतु अनेक दुकानदार पॉस मशिनचा वापर करत नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामूळे अशा दुकानदारांचे परवाने रदद करण्यात का येउन नये अशा स्वरूपाच्या नोटीसा पुरवठा विभागाने काढल्या आहेत.

धान्य वितरणात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आता बायामॅट्रीक प्रणाली योजना पुरवठा खात्याने सुरू केली. त्यानूसार लाभार्थी धान्य घेण्यासाठी रास्त भाव दुकानात आल्यानंतर त्याला अंगठा मशीनवर ठेऊन खात्री करावी लागेल.

त्यानंतर लाभार्थीचा त्वरित संपूर्ण डाटा दिसून येईल. त्याला द्यायचे धान्य, त्याची रक्कम याबाबतच्या संपूर्ण तपशिलाची पावतीच मिशनमधून बाहेर पडेल. त्या पावतीच्या आधारे रास्त भाव धान्य दुकानदार धान्य देईल. अशा पद्धतीने ई-पीडीएस व्यवहार होत असल्याने वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत मिळेल असा विश्वास पुरवठा खात्याने व्यक्त केला आहे.

मात्र अजूनही जिल्हयातील अनेक दुकानांत पॉसव्दारे धान्य वितरण होत नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. अशा दुकानांची तालुकानिहाय माहीती पुरवठा खात्याने संबधित तहसिलदारांमार्फत मागविण्यात आली असून अशा दुकानदारांना मशिनचा वापर केला जात नसल्याने परवाने रदद का करू नये अशा आशयाच्या नोटीसा बजावण्यास सुरूवात केली आहे.

केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून डिजिटल इंडियाचा नारा दिला. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर चालणारी यंत्रणा पोहोचवून त्यावरच सर्व कामे करणे सक्तीचे केले. यापासून वितरण प्रणालीही सुटली नाही.

परंतु ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानांमध्ये लावण्यात आलेल्या पॉस मशीन इंटरनेट कनेक्टिव्हिटी पकडत नसल्याने अनेक ग्राहकांना स्वस्त धान्य वेळेत मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी दिवाळीच्या सणातही अनेक ग्राहक स्वस्त धान्यापासून वंचित राहिले. पॉस मशीन सध्या ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

LEAVE A REPLY

*