रेशन दुकानदार देणार सामूहिक राजीनामे; पॉस मशीनची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय

0
नाशिक । रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांची शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या पाँईट ऑफ सेल मशीन यंत्रणेची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेत जिल्ह्यातील काही रेशन दुकानदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात आज रेशन दुकानदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. संघटनेच्या या मागणीला जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी पाठिंबा दर्शवल्याने रेशन व्यवस्था पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून रेशन दुकानदार आणि शासन यांच्यात वाद सुरू आहे. मात्र वारंवार होणार्‍या चर्चेच्या फेर्‍यांतून आश्वासनाव्यतिरिक्त कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने दुकानदारांनी हा पवित्रा घेतला आहे. आश्वासनांची पूर्तता न करता उलट रेशन दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांचे अर्ज भरून घेत आदी कामे करवून घेतली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शासकीय धान्य गुदामातून थेट रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचवण्याची शासनाची जबाबदारी असताना ती पाळली जात नाही.

उलट हमालांकडून जबरदस्तीने पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे हमालीमुक्त धान्य मिळावे, कमी केलेला घासलेटचा कोटा पूर्ववत करावा, आधारकार्ड क्रमांक गोळा करण्याचे काम शासकीय यंत्रणेने करावे आदी मागण्यांसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

आता रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने शासनाने रेशन दुकानात बायोमेट्रिक प्रणालीची अंमलबजावणी करत पॉईंट ऑफ सेल अर्थात पॉस मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे शिधापत्रिकाधारकाच्या अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतरच त्यांना धान्य दिले जाणार आहे. या मशीनचे वाटप उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे. मशीन स्वीकारण्याचा निर्णय रेशन दुकानदारांनी घेतला आहे. मात्र मशीन स्वीकारून तेथेच सामूहिक राजीनामे देणार आहेत.

LEAVE A REPLY

*