Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसिन्नर : स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्याला पोलिसांकडून मारहाण

सिन्नर : स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्याला पोलिसांकडून मारहाण

file photo

सिन्नर । विलास पाटील

- Advertisement -

स्वस्त धान्य दुकानात हक्काचे धान्य घेण्यासाठी गेलेल्या जेष्ठ नागरिकाला उठा-बशा काढण्याची शिक्षा सिन्नरच्या दोन पोलिसांनी ठोठावल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा त्यातून वगळण्यात आली आहे.

किराणा दुकान, भाजीबाजार, बँका, औषध विक्रीची दुकाने, स्वस्त धान्य दुकानांमध्ये सर्वांना जाता येईल. मात्र, तेथे गर्दी करता येणार नाही. अशा शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत.

दुकांनामध्ये 1 मीटर अंतरारवर ग्राहकांना उभे करावे अशाही स्पष्ट सूचना आहेत. त्यानूसार लोंढेगल्लीतील तालुका विडी कामगार संघाच्या स्वस्त धान्य दुकानात संचालक संजय झगडे हे लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करीत होते.

दुकानाच्या बाहेर 2-3 लाभार्थी उभे होते, तर दुकानात एक लाभार्थी धान्य घेत होता. त्याचवेळी दोन पोलीस मोटार सायकलवर तेथे आले व तेथे उभे असलेल्या दोघा-तिघांना हातातील काठ्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली.

दुकानात धान्य घेण्यासाठी आलो आहोत, असं सांगूनही पोलीस ऐकेनात. तेथे असलेले पोपट आबाजी बलक नावाचे जेष्ठ नागरिक यांना पोलीसानी ऊठा-बशा काढण्यास भाग पाडले.

त्यानंतरच्या सर्व लाभार्थ्यांना पिटाळून लावत व दुकान बंद करायला भाग पाडून दोघे पोलीस निघून गेले. दोन दिवसांपूर्वी खंबाळे येथील स्वस्त धान्य दुकानदाराला पोलीसांनी मारहाण केली असून आजच्या घटनेने स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये पोलीसांची दहशत निर्माण झाली आहे.

शासनाने अत्यावश्यक सेवेत स्वस्त धान्य दुकानांचा समावेश केला असून एप्रिल महिण्यात लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये म्हणून एप्रिल महिण्याचे धान्य भरुन घेण्याचे काम तहसीलचा पुरवठा विभागाच्यावतीने सुरु आहे. त्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून येणार्‍या स्वस्त धान्य दुकानदारांनाच मारहाणीसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागत असेल तर हे काम पुढे कसे सरकणार असा प्रश्‍न विचारला जात आहे.

पुरवठा विभाग काम कसे करणार..?

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत केंद्रशासनाने देशभर संचारबंदी लागू केली असून या काळात सर्वसामान्यांना धान्यापासून वंचित रहावे लागू नये यासाठी तालूक्यातील 149 रेशन दुकानदारांकडून एप्रिल महिण्याचे नियतन भरुन घेण्याचे काम सुुरु आहे. या दुकानदांरासह पुरवठा विभागाचे आम्ही सर्व कर्मचारी-अधिकारी जीव धोक्यात घालून काम करत आहोत.

मात्र, पोलीसांच्या अशा दहशतीमुळे आम्हाला काम करणे अवघड बनले आहेत. आधी खंबाळेच्या दुकानदाराला ओळखपत्र दाखवूनही मारहाण झाली. आता दुकानात आलेल्या जेष्ठ लाभार्थ्यालाच मारहाण झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही काम कसे करावे?

प्रज्ञा हिरे, अव्वल कारकून, पुरवठा विभाग  

पोलीस कर्मचार्‍यांना सूचना देणार

देशभर संचारबंदी लागू असली तरी अत्यावश्यक सेवा त्यातून वगळण्यात आल्या आहेत. पोलीस कर्मचार्‍यांकडून मारहाणीचे प्रकार झाले असतील तर ते दुर्दैवी आहेत. त्यांना तातडीने सुचना देण्यात येतील. शहरात फिरणार्‍यांचे ओळखपत्र तपासून कुठल्या कामासाठी ते फिरत आहेत हे जाणून घेवूनच कारवाई करण्यासंदर्भात विचार व्हावा, अशा त्यांना सूचना देण्यात येतील.

साहेबराव पाटील, पोलीस निरिक्षक  

- Advertisment -

ताज्या बातम्या