राठोड यांच्यामुळे तपासात विसंगती

0

केडगाव हत्याकांड : पोलिसांच्या अहवालात शिवसेनेवर बोट

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास योग्य त्या दिशेने सुरू होता. मात्र, शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हत्याकांडाला राजकीय वळण देत दोन पक्षांत दरी निर्माण केली. तसेच तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आरोप-प्रत्यारोप केले. त्यामुळे पोलिसांविषयी आत्मीयता राहिलेली नाही. येणार्‍या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापेक्षा हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात यावा, असा अहवाल पोलीस प्रशासनाने गृह विभागाकडे पाठविला आहे.

केडगाव हत्याकांडातील तपासातील विसंगतीचे खापर पोलीस प्रशासनाने राठोड यांच्यावर फोडल्याचे समोर आले आहे.केडगाव हत्याकांड घडले तेव्हापासून पोलीस शिवसेनेच्या रडारवर राहिलेले आहेत. पोलीस अधिकार्‍यांना शिवीगाळ करणे, मारहण करणे, अशी अनेक कृत्ये करण्यात आली.

या दरम्यान एसपी कार्यालयावर हल्ला झाला. केडगाव हत्याकांड व हल्ला अशी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला. त्यामुळे शिवसेनेत सर्व काही आलबेल होते. मात्र, केडगाव दगडफेक प्रकरण पुढे करुन पोलिसांनी 600 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर खर्‍या स्टंटबाजीला सुरूवात झाली. मातोश्रीवर जाणे, मुख्यमंत्र्या वर्षा या निवासस्थानी आंदोलनाचा इशारा देणे, पोलिसांवर आरोप करुन कारवाईची मागणी करणे, उपोषण करणे असे खेळ मांडण्यात आले. या सर्व प्रकाराला पोलीस वैतागले होते.

केडगाव हत्याकांडातील मुख्य आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. हा विषय बाजूला राहिला. मात्र, राजकीय आकसापोटी पोलिसांवर दबावतंंत्राचा वापर करण्यात आला. हे नगरकरांनी पाहिलेले आहे. त्यामुळे हा तपास कठोर शिक्षेसाठी नाही. तर केवळ राजकारणासाठी ताणला जात आहे, हे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आले होते. विशेष म्हणजे पोलिसांवर धावून जाणे, हमरीतुमरी करणे, अर्वाची भाषा वापरणे हे नगरच्या राजकीय वर्तुळात नवे नाही. त्यामुळे अन्य विभागांच्या तुलनेत पोलीस नेहमीच टीकेचा धनी ठरलेली आहे. त्याचाच फायदा घेऊन ही स्टंटबाजी सुरू होती. मयताच्या नातेवाईंकानी आणि शिवसैनिकांनी उपोषण सुरू केले, तेव्हा जाणिवपुर्वक तपासासाठी सीआयडी नव्हे, तर सीबीआयची मागणी करण्यात आली. जे अशक्य आहे. त्यामुळे तपास कोठे वर्ग होत नाही. मात्र पोलिसांनी स्वत: अहवाल तयार करुन तो गृहखात्यापर्यत तत्काळ पाठविण्याची खबरदारी घेतली.

अहवालात म्हटले आहे, केडगाव तपासात आता राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. पोलिसांनी जो तपास केला. तो योग्य असून देखील दबाव आणणे, आरोप करणे, उपोषणासारख्या वेगवेगळ्या दबाव तंत्रांचा वापर करणे असे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे नातेवाईक व अन्य कार्यकर्त्यांचा स्थानिक पोलिसांवर विश्वास राहिला नाही, असे दिसून येत आहे. हा तपास सुरू असताना उपोषणात मयतांचे दोन्ही कुटुंब उपोषणाला बसले आहे. त्यांच्या प्रकृती खालावू शकते. स्थानिक पदाधिकारी व जबाबदार लोकप्रतिनिधी अन्य कार्यकत्यांना गैरमार्गाने प्रेरीत करीत आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा तपास सीआयडीकडे गेल्यास पोलीस प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही. कोणी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर काडक कारवाई करण्यास आम्ही सक्षम राहू. त्यामुळे हा तपास सीआयडीकडे तत्काळ वर्ग करावा, असे नमुद केले आहे.

आता आरोप कसा करणार ?
केडगाव दुहेरी हत्याकांडात राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अनेकांची नावे पुढे करण्यात आली, अशी चर्चा होती. 37 सेकंदाच्या मोबाईल संभाषणात 40 नावे घेणे कितपत शक्य आहे. तसेच ऐकणार्‍याने ते किती कटाक्षाने समजून घेतली, असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. आता सीआयडीचा तपास सुरू झाला. त्यामुळे कोणावर दबाव आणणार? आता काय स्टंट करणार? कोणावर आणि कसे आरोप करणार, असे प्रश्न समोर आले आहेत.

राजकीय हस्तक्षेप वाढला !
केडगावचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यासाठी अहवाल पाठविला आहे. तो मंजूर देखील झाला आहे. आता यात पोलिसांचा कोणताही हस्तक्षेप नाही. यात राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळेच हा तपास आम्ही वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. मात्र, या अहवालात काय आहे, हे सांगणे त्यांनी टाळले.

LEAVE A REPLY

*