स्वाभिमानी संघटनेचा आज राहुरीत रास्ता रोको

0
राहुरी स्टेशन (वार्ताहर) – अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी उसाला प्रती टन 3400 रुपये भाव त्वरित जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता राहुरी येथे कृषिउत्पन्न बाजार समितीसमोर नगर-मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली.
तहसीलदार राहुरी, यांना दिलेल्या निवेनात म्हटले, जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास प्रारंभ झालेला आहे. मात्र, कोणत्याही साखर कारखान्याने अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही. या सर्व कारखान्यांनी त्वरित प्रती टन 3400 रुपये भाव जाहीर करावा.
तसेच उसाचे वजन कमी येत असल्याची शेतकर्‍यांची भावना असल्याने कारखान्यांनी उसाचे वजन व त्यापोटी मिळणारे पेमेंट ऑनलाईन करावे व ऊसतोड झाल्यापासून 15 दिवसात पेमेंटची सर्व रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करावी. यासह शेतकर्‍यांच्या इतर मागण्यांसाठी खा. राजू शेट्टी यांच्या आदेशावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र अंादोलन हाती घेत असून अंादोलनाच्या पहिल्या टप्प्यात आज राहुरीत रास्ता रोको अंादोलन होणार आहे.
निवेदनावर प्रकाश देठे, दिनेश वराळे, अरुण डौले, सुभाष वने, संग्राम धुमाळ, किशोर भिंगारकर, प्रवीण पवार, सुनील इंगळे, सतीश पवार, सचिन म्हसे, संदीप खुरूद, सचिन पवळे, प्रशांत पवार, प्रमोद पवार, सचिन पवार, देविदास करपे, संजय डौले, भगीरथ पवार आदींची नावे असून आंदोलनात सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी सामील व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*