Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव बंद; व्यापाऱ्यांवर जाचक अटी; शेतकऱ्यांनी लासलगावी लिलाव बंद पाडला

Share

नाशिक/लासलगाव | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे पुन्हा वांधे झाले आहेत. केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्यानंतर व्यापाऱ्यांवर लादलेल्या कांद्याच्या साठवणूक मर्यादेमुळे व्यापारीवर्ग संभ्रमात आहे. यामुळे लासलगाव, मुंगसे, उमराणे येथील व्यापाऱ्यांनी अद्याप लिलाव सुरु केलेले नाहीत. लिलाव सुरु न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत संताप व्यक्त केला आहे.

कांदा निर्यातबंदी केल्यानंतर व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेल्या जाचक अटींमुळे व्यापारी वर्ग संभ्रमात असून नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजारसमित्यांचे आज सकाळपासून लिलाव बंद आहेत.

कांद्याला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी कांदा मार्केटला विक्रीसाठी आणत आहेत, मात्र अचानक लिलाव बंद झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मालेगाव तालुक्यातील मुंगसे आणि देवळा तालुक्यातील उमराणे येथे रास्ता रोको केला. निफाड तालुक्यातील विंचूर येथेही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला होता मात्र याठिकाणी पोलिसांनी रास्ता रोको उधळून लावला.

कांद्याचे दर गगनाला भिडल्यामुळे तसेच कांद्याचा तुटवडा जाणवत असल्यामुळे केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केली. यामुळे कांदा देशातंर्गत विक्री होणार असून भावदेखील स्थिर राहतील असे बोलले जात आहे. मात्र, मोठ्या व्यापाऱ्याकडे साठवणूक असलेल्या कांद्याची मर्यादा ५०० क्विंटल तर लहान व्यापाऱ्याकडील साठवणूक केलेल्या कांद्याची मर्यादा १०० क्विंटल ठेवल्यामुळे व्यापारी वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केल्यानंतर त्याची प्रतवारी ठरवून कांदा इतरत्र विक्रीसाठी पाठविण्यासाठी मोठा कालावधी लागतो. यामुळे शासनाने आखून दिलेली मर्यादा फार कमी असून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा गोडावूनमध्ये पडून राहिला तर तय्न्च्यावर कारवाईचा बडगा शासनाकडून उचलला जाणार आहे. त्यामुळे व्यापारी असोशिएशनकडून बैठका सुरु असून व्यापारी कांदा लिलाव बंद करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

दरम्यान, लासलगाव येथे व्यापारी असोशिएशनची बैठक पार पडली. त्यानंतर, सकाळी ११ वाजता कांद्याचा लिलाव लासलगावी सुरु झाला. मात्र व्यापाऱ्यांनी शुक्रवारच्या तुलनेत ८०० रुपयांनी कांद्यावर कमी बोली लावत माल खरेदी केला. १०-१२ वाहनांचा लिलाव यादरम्यान पार पडला. मात्र, कमी बोली लावल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. यामुळे लासलगाव बाजार समितीत तणावपूर्ण शांतता बघायला मिळाली.

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर त्याचे पडसाद आज उमटले. आज कांद्याचे भाव पडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी निफाड येथे शांतीनगर चोफुलीवर रस्ता रोको आंदोलन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!