Friday, May 3, 2024
Homeधुळेधुळ्यात पाच ठिकाणी रॅपीड टेस्ट सेंटर

धुळ्यात पाच ठिकाणी रॅपीड टेस्ट सेंटर

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी वाढली असून अनेक जण विना मास्क फिरत आहेत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आज शहरात पाच ठिकाणी स्टॉल लावून विना मास्क फिरणार्‍या नागरिकांची रॅपीड टेस्ट करण्यात येत आहे.

- Advertisement -

विना मास्क रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांना पकडून त्यांना स्टॉलमध्ये बळजबरीने नेऊन करोना टेस्ट केली जात आहे. तसेच मास्क न वापरणार्‍यांवर महापालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीने फुलली आहे. नागरिकांना कोरानाची कुठलीही भिती नसल्याचे दिसून येत आहे. अनेक नागरिक तर बिनधास्तपणे विना मास्क फिरतांना दिसून येत आहेत.

वास्तविक करोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. प्रशासनाने थंडीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली असून काळजीही घेण्याचे आवाहन केले आहे.

त्यामुळे आज जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या निर्णयानुसार शहरातील बारा फत्थररोड, शहर पोलीस चौकी, महात्मा गांधी पुतळा, शिवतिर्थ चौक आदी ठिकाणी स्टॉल लावून विना मास्क फिरणार्‍या नागरिकांची रॅपीड टेस्ट करण्यात येत आहे. महापौर चंद्रकांत सोनार व आयुक्त अजीज शेख यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेच्या शुभारंभावेळी आयुक्त अजीज शेख, महापौर चंद्रकांत सोनार, सभापती सुनिल बैसाणे, नगरसेवक देवा सोनार, आरोग्याधिकारी डॉ.महेश मोरे आदी उपस्थित होते. जे नागरिक विना मास्क रस्त्यावर फिरत आहेत, अशा नागरिकांची वाहने अडवून या स्टॉलमध्ये नेले जात आहे. त्यांची रॅपीड टेस्ट करुन त्यांना जागेवरच रिपोर्ट कळविला जात आहे. त्यामुळे मास्क न वापरणार्‍यांची चांगलीच धांदल उडाली होती.

करोनामुक्तीत धुळे आघाडीवर-महापौर

राज्यात करोनामुक्तीत धुळे शहर आघाडीवर आहे. महापालिका आयुक्त, स्थायी समितीचे सभापती, उपायुक्त, मनपा कर्मचारी तसेच सफाई कर्मचार्‍यांच्या योगदानामुळेच शहरात कोरोनावर आपण नियंत्रण मिळू शकलो.

भविष्यात आपल्याला कोविडचा संपुर्ण नायनाट करावयाचा आहे. त्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या माध्यमातून शहरात 5 ठिकाणी कोविड टेस्टसाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. नागरिकांनी स्वॅब तपासुन घ्यावे व मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अनेक जण मास्कही वापर नाहीत. त्यामुळे मनपा व पोलीस दंत्मात्मक कारवाई करत आहेत. पुढील काळात करोना वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पाच ठिकाणी स्टॉल लावून नागरिकांची रॅपीड टेस्ट केली जात आहे. त्यात विनामास्क फिरणार्‍यांना पकडून त्यांची टेस्ट केली जाणार आहे. जो पॉझिटिव्ह आढळून येईल, त्यांच्यावर उपचार केले जातील. नागरिकांनी सोशल डिस्टन्स व मास्कसह शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी यावेळी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या