Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रडिसले गुरुजींचे आणखी एक यश, आता मिळाला हा सन्मान

डिसले गुरुजींचे आणखी एक यश, आता मिळाला हा सन्मान

मुंबई | Mumbai

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून २०२१ ते जून २०२४ या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे.

- Advertisement -

रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याने शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून डिसले गुरुजींवर सोलापूर जिल्ह्यासह, राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कामात आता झेडपीच्या गुरुजींचं योगदान असणार आहे. जगभरातील १२ व्यक्तींची या समितीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आली आहे. त्यामध्ये बार्शीच्या डिसले गुरुजींचा समावेश आहे.

दरम्यान, याअंतर्गत जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील १२ व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रंजितसिंह डिसले यांना मिळाला आणि महाराष्ट्रात त्यांचं खूप कौतुक झालं. तब्बल सात कोटी रक्कमेचा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले. जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली.

कोण आहेत रणजितसिंह डिसले?

रणजितसिंह डिसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचं शालेय शिक्षण बार्शीमधल्याच सुलाखे विद्यालयामध्ये झाले. ते २००९ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असताना रणजितसिंह डिसले यांच्या सेवेची दखल जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सर्वप्रथम घेतली होती. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे डिसले यांना आपले काम जागतिक पातळीवर नेता आले. शिक्षणशात्र हा डिसले यांच्या अभ्यासचा विषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.

काय आहे पुरस्कार

युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत रणजितसिंह डिसले प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. तब्बल सात कोटींचा पुरस्कार त्यांना मिळाला. परंतु हे कार्य सोपे नव्हते. कारण या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल १२ हजार नामांकने दाखल झाली होती. त्यापैकी १० शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळाले. त्यात रणजितसिंह डिसले हे होते अन् ते अंतिम विजेते ठरले. या पुरस्काराची रक्कम १ दक्षलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांहून अधिक आहे. डिसले यांनी यातली निम्मी रक्कम इतर १० शिक्षाकांमध्ये वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला. डिसले यांच्या निर्णयामुळे या शिक्षकांना प्रत्येकी जवळपास ४० लाख रुपये मिळणार आहेत.

काय केले डिसले यांनी

डिसले यांनी शिक्षणामध्ये इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला आहे. पुस्तकांमध्ये QR कोडच्या माध्यमातून मुलांना सोप्या भाषेत कसे शिकता येईल यावर अधिक भर ते देतात. आज आपण 3D चित्रपट पाहतो , 3 D चित्रे पाहतो. मात्र रणजीतसिंह यांनी पुस्तकेच 3D स्वरुपात बनवली आहेत. Augmented Reality या तंत्राचा वापर करून ही आभासी पुस्तके बनवण्यात आली असून यात विज्ञान व भूगोल विषयातील कठीण संकल्पना 3D रुपात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.आपल्या जवळ असणारा हा स्मार्ट फोनच आपल्याला या आभासी पुस्तकांचा अनुभव देतो. QR कोडेड बुक्स काय किंवा Virtual बुक्स काय , ही भविष्याचा वेध घेणारी पुस्तके आहेत. इ-लर्निंग , डिजिटल लर्निंग च्या नावाखाली लाखो रुपये खर्ची पडत असताना मोबाईल लर्निंग चा हा प्रयोग नक्कीच दखलपात्र ठरतो.

बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात QR कोड

बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कविता त्यांनी ऑडीओ रुपात तयार करून घेतल्या.पाठांशी संबंधित विडीओ स्वतः तयार केले.पालक व शिक्षक यांना मार्गदर्शक असे विडीओ ‘QUEST’ सारख्या संस्थांकडून घेतले.तसेच मुलांचे मूल्यमापन करण्यासाठी online प्रश्नपत्रिका देखील तयार केल्या.आपल्या मुलाचा अभ्यास कसा घ्यावा ? मुल समजून कसे घ्यावे ? याविषयीच्या मागर्दर्शक सूचना देखील या QR कोड मध्ये आहेत.हा सर्व अंकीय आशय ( Digital content ) त्यांनी QR कोड मध्ये रुपांतरीत केला. हे सर्व कोड त्यांनी पुस्तकात संबंधित पानांवर चिटकवले.मोबाईल मधील NEO Reader या app च्या सहाय्याने हा QR कोड स्कॅन केला कि त्या पानावरील कविता ऑडीओ रुपात ऐकायला मिळते, पाठाचा विडीओ पाहता येतो. विडीओ पाहून झाला कि लगेच online प्रश्नपत्रिका मोबाईल वर झळकू लागते.

- Advertisment -

ताज्या बातम्या