रांजणगाव लूट प्रकरणी तिघांना पाच वर्षे कारावास

0
नाशिक | रांजणगाव-वेसगाव रस्त्यावर २८ मे २०१५ साली झालेल्या लुट व मारहाणीप्रकरणातील तिघांना आज नाशिक येथील विशेष मोक्का न्यायालयाने पाच वर्ष कारावास व पाच लाखांचा दंड ठोठावला.

या घटनेची माहिती अशी की, २८ मे २०१५ साली रात्री आठ वाजेच्या सुमारास भाऊसाहेब मोगल गायकवाड व त्यांचा सोबती विशाल अंबादास व्यवहारे हे वडगावपांग येथून कोंबडी खाद्य घेऊन रांजणगाव रस्त्याने वेस गावाकडे जायला निघाले होते.

रात्री सव्वादहा वाजेच्या  सुमारास एका मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी वाहन अडवले आणि भाऊसाहेब गायकवाड आणि विशाल व्यवहारे यांना मारहाण करत त्यांच्याकडील १२ हजारांची रक्कम लुटली होती.

त्यानंतर जखमी झालेल्या गायकवाड आणि व्यवहारे यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणाचा शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी केला. या तिघांची नावे नारायण नामदेव वायकर (वय ३५ सोनेवाडी ता. कोपरगाव जि. अ.नगर), राहुल संजय शिंगाडे (वय २५, सोनेवाडी, ता. कोपरगाव, जि. अ.नगर), सुनील शिवाजी थोरात (वय २२, हागे ता. राहता) अशी असल्याचे समजले. हे तिघेही संशयित गुन्हेगारीशी संबंधित असल्यामुळे मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

तत्कालीन विशेष पोलीस महासंचालक जयजीत सिंग यांनी या तपासाला प्राथमिक मंजुरी दिली होती. त्यानंतर या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णलाल बिष्णोई यांनी या प्रकरणी मोक्का अंतर्गत खटला दाखल करण्यास परवानगी दिली होती.

तेव्हा हा खटला नाशिकमधील विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. यावेळी सरकारी पक्षाकडून सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी २० साक्षीदार तपासले.  त्यानंतर नाशिक न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर शर्मा यांनी आज या खटल्याची सुनावणी करत तिघांना ५ वर्षे कारावास आणि पाच लाखांचा दंडाची शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

*