Thursday, April 25, 2024
Homeनगररामपूरवाडीत प्रतिकात्मक सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडीत भरते जि.प. शाळा

रामपूरवाडीत प्रतिकात्मक सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडीत भरते जि.प. शाळा

राहाता (तालुका प्रतिनिधी) – एखादी शाळा रेल्वेत भरतेय म्हटलं तर विश्वास बसणार नाही. मात्र राहाता तालुक्यातील रामपूरवाडी गावची जिल्हा परिषदेची शाळा चक्क रेल्वेत भरतेय असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. कारण चक्क रेल्वेची प्रतिकात्मक इमारत रंगवून जणू शाळा रेल्वेत असल्याचाच भास होतोय. या शाळेने सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घालून कुतूहल वाढविले आहे. नेमकी कशी आहे शाळा पाहुयात याचा स्पेशल रिपोर्ट.

राहाता तालुक्यातील रामपूरवाडी हे गाव म्हणजे तालुक्याचे शेवटचे टोक. याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था झाली होती. त्यात अवकाळी पावसानं झोडपल्यानं शाळेची जुनी इमारत मोडकळीस आली. यानंतर शाळेतील शिक्षकांनी एकत्र येत ग्रामस्थांच्या मदतीनं शाळेचं रूप पालटवण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच रेल्वेची प्रतिकृती असणारी रंगरंगोटी व डागडुजी शाळेला करण्यात आली. शाळेचं रूपच एकदम बदलून गेलं. आज प्रत्येकाला हेवा वाटावा व विद्यार्थ्यांना आकर्षण वाटेल अशी ही शाळा दिसत आहे.

- Advertisement -

या शाळेतील शिक्षक, पालकांच्या सहकार्यातून आम्ही नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण होईल. असाच प्रयोग शाळेला रंगरंगोटी करताना घेतला. हुबेहूब दिसणार्‍या रेल्वेगाडीत हे विद्यार्थी चक्क रेल्वेत प्रवेश करतात, असा भास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास सुसाट सुरू झाला आहे आणि त्याचेच रुपांतर आज रामपूरवाडी एक्सप्रेस झाल्याचे प्रयोगशील शिक्षक वैभव गोसावी यांनी सांगितलंय.

दरम्यान आज शाळेत जाताना घरचे सुद्धा तुझी ट्रेन लेट होईल लवकर जा, असं म्हणून आम्हाला शाळेत पाठवतात, अशा प्रतिक्रिया विद्यार्थांनी दिल्यात. या आनंददायी प्रयोगामुळे विद्यार्थी खुष आहेत. एकीकडे मराठी शाळांचा टक्का घसरतोय, असं म्हटलं जाते मात्र राज्यातील अनेक शिक्षक नवनवीन प्रयोग राबवून शिक्षणाचा दर्जा वाढवताय हे मात्र नक्की. ही आनंददायी संकल्पना सर्वांनाच भावली आहे. हे रामपुरवाडीतील शिक्षकांनी दाखवून दिले आहे.

मराठी शाळांसाठी सरकारने अनुदान दिल्यास मराठी शाळांचा टक्का अजून वाढणार हे मात्र निश्चित, असे पालकांंनी यावेळी सांगितले. वैभव गोसावी, प्रसाद तिकोणे, शिवनाथ गायके, राजेंद्र जगताप या शिक्षक व शाळा व्यवस्थापन कमिटीचे यात मोठे योगदान लाभले आहे. ग्रामस्थांनीही मोठे सहकार्य केल्यानेच हे सर्व घडल्याचे बोलले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या