रामकुंडावरील स्वच्छतेचे तीन तेरा; निम्मे सफाई कर्मचारी बेपत्ता

0
नाशिक | दि.१६ प्रतिनिधी- मुंबई उच्च न्यायालयाने गोदाप्रदुषण रोकण्यासाठी महापालिकेला दिलेल्या निर्देशानंतरही सफाई कर्मचार्‍यांकडुन रामकुंड परिसर स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी महापौर रंजना भानसी यांनी अचानक केलेल्या पाहणी दौर्‍यात समोर आला. याठिकाणी सफाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ३४ पैकी १८ कर्मचारीच हजर असल्याचे समोर आल्यानंतर महापौरांनी गैरहजर कर्मचार्‍यांच्या बिनपगारी रजा लावण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले.

शहरात गेल्या काही दिवसात अनियमित घंटागाड्या आणि स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असुन यासंदर्भात नगरसेवकांच्या तक्रारी आहे. त्याचबरोबर शहरात अनेक भागात रस्त्याच्या कडेला व चौकात कचर्‍याचे ढिग बघायला मिळत आहे. असे चित्र असतांना निदान रामकुंड परिसरात तरी चांगली स्वच्छता होत असल्याचा महापौरांचा समज आज खोटा ठरला.

एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोदा प्रदुषणमुक्ती गोदाकाठावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती व जागो जागी स्वच्छतेचे फलक लावण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे रामकुंड परिसरात महापालिका सफाई कामगारांकडुन स्वच्छेचे काम गांभीर्याने केले जात नसल्याचे उघड झाले आहे. आज सात वाजता अचानक महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरुण पवार, जगदिश पाटील यांनी पाहणी दौरा केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

रामकुंडावर असलेल्या सफाई कामगाराच्या हजेरी शेडला महापौरांनी भेट दिल्यानंतर ३४ पैकी १८ कर्मचारीच हजर असल्याचे आणि उर्वरित े कर्मचारी कामावरुन बेपत्ता असल्याचे दिसुन आले. तर स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी हे रजेवर असल्याचे महापौरांना सागण्यात आले. त्यावेळी गोसावीनंतर काम करणारे सहा.

स्वच्छता निरीक्षक मारु देखील जागेवर नसल्याचे समोर आले. त्यावेळी मारु यांनी आपण दुसर्‍या ठिकाणी कामावर होतो, असे उत्तर महापौरांना दिले. तेव्हा महापौरांनी त्यांना ‘ चला आपण तुम्ही ज्या ठिकाणी काम करीत होता, तेथे जाऊव पाहणी करु ’ असे सांगितले. तेव्हा या प्रकाराने पकडले जाऊ हे लक्षात आल्यावर मारु यांनी कामावर आत्ताच आल्याची कबुली दिली. अशाप्रकारे आरोग्य विभागाचा रामकुंड परिसरातील कारभार महापौरांसमोर आला.
या प्रकारांनतर महापौरांनी रामकुंड परिसरात स्वच्छतेची पाहणी केली असता या परिसरात कोणतीही साफ सफाई केल्याचे दिसुन आले नाही. उलट जागोजागी कचर्‍याचे ढिग पडलेले असल्याचे दिसुन आले. तसेच घंटागाडी न आल्याने कचरा कुंडीत मोठा कचरा दिसुन आला. सकाळी मोठ्या प्रमाणात दशक्रिया विधी होत असतांना त्यापुर्वी स्वच्छता होणे अपेक्षित असतांना सफाई केली जात नसल्याचेही पाहणी दौर्‍यात समोर आले.

यानंतर महापौरांनी पुर्व प्रभागात असलेल्या लोकमान्य विद्यालय परिसराला भेट दिली असतांना याठिकाणी मोठा कचरा पडलेला दिसुन आला. अशाप्रकारे एकुणच प्रकारांची दखल घेत महापौरांनी गैरहजर असलेल्या सफाई कर्मचार्‍यांचा बिनपगारी रजा लावण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले.

निर्बीजीकरण गेले कुठे?
रामकुंड परिसरात आज झालेल्या पाहणी दौर्‍यात महापौर व नगरसेवकांनी स्वच्छतेबरोबर काही मोकाट कुत्र्यांची पाहणी केली. मात्र एकाही कुत्र्यांचा कान कापलेला असल्याचे आढळले नाही. त्यामुळे अलिकडेच दरमहिन्याला केल्या जाणार्‍या श्‍वान निर्बीजीकरणांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. हाच धागा पकडत ‘ मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण गेले कुठे ? असा प्रश्‍नही महापौरांनी यावेळी उपस्थित केला.

बायोमेट्रीक हजेरी हवी : महापौर भानसी
शहरातील सफाई कर्मचार्‍यांच्या हजेरी शेडवर आरोग्य अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांचे नियंत्रण नाही. जोपर्यत अधिकारी खालच्या कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवत नाही, तोपर्यत कितीही कर्मचारी भरले तरी स्वच्छतेची ही परिस्थीती राहणार आहे. त्यामुळे हजेरी शेडवर आता बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी सुरू करायला हवीत, असेही महापौरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*