Thursday, April 25, 2024
Homeनगरनगरमधील भाजपच्या पराभवास विखे जबाबदार

नगरमधील भाजपच्या पराभवास विखे जबाबदार

शिंदे, कर्डिले, कोल्हेंचा थेट आरोप : ज्या पक्षात जातात तेथे खोड्या करतात

नाशिक (प्रतिनिधी)– नगर जिल्ह्यात भाजपच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखेपाटील जबाबदार आहेत. ते ज्या पक्षात जातात, तिथे खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण निर्माण करतात, असा थेट आरोप माजी मंत्री व कर्जत-जामखेडचे भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांना राहुरीचे माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी दुजोरा दिला.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जाहीर नाराजीनंतर भाजपने मडॅमेज कंट्रोल मोहिम सुरू केली आहे. खडसेंचे प्रभाव क्षेत्र असलेल्या उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पराभव का झाला, याचा अहवाल भाजपकडून तयार केला जाणार आहे. त्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील 12 पराभूत उमेदवारांना नाशिक बैठकीला बोलावण्यात आले होते. आ.आशिष शेलार यांनी त्यांची मते जाणून घेतली.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे, कोल्हे, कर्डिली या तिघांनीही विखेंवर हल्लाबोल केला. विशेषत: राम शिंदे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. शिंदे म्हणाले, नगर जिल्ह्यामध्ये भाजपचे पाच आमदार होते. विखे आणि पिचड आल्यानंतर ती संख्या सातवर गेली होती. त्यात आणखी वाढ होणे अपेक्षित होेते. पण निवडणुकीनंतर ती तीनपर्यंतच मर्यादित राहिली. जिल्ह्यातील जागा 12-0 ने जिंकू असे विखे म्हणत होते. त्यांची काही फार ताकद होती, असे नाही. पण जी काही होती, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे. ते जिथे जातात, तिथं खोड्या करतात. त्या पक्षाच वातावरण बिघडवतात.
स्नेहलता कोल्हे यांनी देखील हाच सूर लावला. विखेंनी कोपरगाव मतदारसंघात स्वत:च्या मेव्हण्याला अपक्ष म्हणून उभे केले होते. पण त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, असे त्या म्हणाल्या. तर, मी या दोघांच्या मताशी सहमत आहे, असे शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील 12 जागांवर भाजपचा पराभव झाला. त्याची नेमकी कारणे काय आहेत, याचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे आ. आशिश शेलार यांनी सांगितले.

- Advertisement -

व्यक्तीचा दोष पक्षावर टाकणे अयोग्य
एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांनी पक्षाला दोष दिला आहे. याबाबत विचारले असता राम शिंदे म्हणाले, माझ्यापुरते म्हणाल तर पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही. पक्षाने मला तीनदा उमेदवारी दिली. आमदार झालो. मंत्री केले. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा दोष पक्षावर टाकणे योग्य नाही. आमच्या मतांची दखल घेतली हे चांगले झाले. कोअर कमिटीत चर्चा होईल व कारवाई होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नाराजीला तोंड फुटले
पाच वर्षांत पक्षांतर्गत राजकारणापासून दूर ठेवले गेलेले एकनाथ खडसे सध्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. पक्षाच्या दुसर्‍या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी पक्षाला आव्हान दिले आहे. भाजपमध्ये राहीन की नाही याचा भरोसा नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. भाजपमधील नाराज ओबीसी नेत्यांची मोटही त्यांनी बांधली आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. खडसे यांची नाराजी दूर करावी, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. दरम्यान, भाजपातील अन्य नाराज नेतेही आता उघडपणे आपली भुमिका मांडू लागले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या