पोलीसदादाला राखी बांधून करणार ‘रक्षाबंधन’

उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे केले जात आहे आवाहन

0
नाशिक । बहिणीच्या हातून राखी बांधून भाऊ बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याची शपथ घेतो. तसेच सण, उत्सव सर्वकाही विसरून चोवीस तास कर्तव्य बजावणार्‍या आणि कायदा, सुव्यवस्था जपून नागरिकांचे संरक्षण करणार्‍या पोलीसदादांसोबत यंदाचे रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरे करण्याचे नाशिकमधील महिलांनी ठरवले आहे. सध्या या महिला व्हिडीओच्या माध्यमातून नाशिकमधील जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.

महिलांचे अनेक प्रश्न असतात, परंतु पोलिसांना त्या घाबरतात. कारवाई होईल, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात असतात. त्यामुळे पोलीसदादा व त्यांच्यात सुसंवाद वाढावा, महिलांना पूर्णपणे सुरक्षित वाटावे, पोलीस यंत्रणा त्यांच्या संरक्षणार्थ सदैव तत्पर असेल याची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून नाशिकचे डॉ. शैलेंद्र गायकवाड आणि शहरातील अनेक जागरुक महिला एकत्र आल्या. त्यांच्याकडून सध्या महिलांना एकत्र करून रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या समाजाच्या रक्षणकर्त्या भावांसोबत जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन रक्षाबंधन साजरे करण्याचे नियोजन आखले जात आहे.

या दिवशी अनेक महिलांना एकत्र येणे शक्य नसते. अशा महिलांनी आपापल्या परिसरातील पोलीस स्टेशन किंवा चौकीवर जाऊन रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना राखी बांधून पोलिसांप्रती आदरभाव व्यक्त करावा. त्यांना सण-उत्सवांच्या दिवशी एकटेपणा जाणवू नये यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या मनीषा रौंदळ, नेहा खरे यांच्यासह पोलीस मित्र व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप, मराठा हायस्कूल ग्रुप आदींच्या माध्यमातून सध्या महिलांना या उपक्रमाबाबत आवाहन केले जात आहे.

दरम्यान, शहरातील महिलांच्या अनोख्या रक्षाबंधनाची कल्पना नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांना भावली असून या माध्यमातून निश्चितच पोलीस बांधवांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयुक्त सिंगल यांनी व्यक्त केला. आम्हीही आमच्या भगिनींच्या स्वागतासाठी तयार राहू, असे पोलीस आयुक्त सिंगल यांनी सांगितले.

उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे : महिलांमध्ये सुरक्षितपणाची भावना वाढीस लागावी, पोलिसांचे सहकार्य घेण्यासाठी चालना मिळावी म्हणून नाशिक शहरातील महिला व पोलीस यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी अनोखे रक्षाबंधन करण्याचे आम्ही ठरवले आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून शहरातील जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग घ्यावा.
डॉ. शैलेंद्र गायकवाड, समन्वयक

LEAVE A REPLY

*