Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वेड्या बहिणीची रे वेडी माया; अन्नत्याग उपोषण करणाऱ्या भावाला बांधली उपोषणस्थळी ‘राखी’

Share

चांदवड | विशेष प्रतिनिधी

‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती

ओवाळीते भाऊराया रे

वेड्या बहिणीची रे वेडी माया’

खरचं बहिणीची माया वेडीच असते; रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ जिथे कुठे असेल तिथे बहिणीच्या राख्या पोहोचतात. चांदवडमधील पंचायत समिती समोर अन्नत्याग उपोषण करणाऱ्या भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी गाठत बहिणीने भावाला राखी बांधली. यानंतर या अनोख्या रक्षाबंधनाची मोठी चर्चा पंचक्रोशीत सुरु होती.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गनुर येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पूजा ठाकरे याचे पती शांताराम ठाकरे हे सर्व कारभार हाकत असल्यामुळे वेळोवेळी तक्रारी करूनही अधिकारी कुठलीही कारवाई करत नाहीत.

यामुळे अधिकाऱ्यांच्या विरोधात येथील ग्रामपंचायत सदस्य रामदास ठाकरे यांनी चांदवड पंचायत समितीसमोर अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, आज भावा बहिणींचा रक्षाबंधन सण असूनही रामदास ठाकरे आपल्या घरी गेले नाहीत. त्यानंतर त्यांच्या बहिणीने उपोषणस्थळ गाठत लाडक्या भावाला राखी बांधून रक्षाबंधन साजरी केले.

यानंतर सोशल मीडियात भावा बहिणीच्या अनोख्या रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियात शेअर झाल्याने कुठल्या ना कुठल्या कारणास्तव नेहमीच प्रकाशझोतात येणारा चांदवड तालुका पुन्हा एकदा यानिमित्ताने प्रकाशझोतात आला.

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती बहीण असते.  म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय म्हणून बहिण निर्माण केली. 

बहिण कुठल्याही परिस्थितीत भावाच्या पाठीशी उभी राहते. भावाने कितीही चुका केल्या तरी त्याला पाठीशी घालत तोंड भरून कौतुक ती करते. भावाच्या अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन पुन्हा भांडायलाही तत्पर असते. 

वेड्या बहिणीची ही वेडी माया चांदवड वासियांनी आज अनुभवली. भाऊ आंदोलनात आहे असे समजल्यानंतर बहिणीने कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आंदोलन स्थळ गाठले. पूजेचे ताट, आरती, बहिणीच्या संरक्षणाचे प्रतिक असलेली राखी घेऊन बहिणीने भावाला मनोभावे ओवाळले. त्याला राखी बांधली. अनेकांची याठिकाणी अनोखे रक्षाबंधन बघण्यासाठी गर्दी झाली होती. काही मिनिटांचा हा डोळे दिपविणारा क्षण अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

फोटो झाले व्हायरल

सोशल मीडियात काय व्हायरल होईल सांगता येत नाही. रात्रीपासून रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यांनंतर सकाळपासून स्वातंत्र्य दिन सोबत भाऊ बहिणीचे फोटो सोशल मीडियात झळकले. दरम्यान, चांदवडच्या पंचक्रोशीत दुपारी उपोषणस्थळी झालेल्या अनोख्या रक्षाबंधनाचे फोटो व्हायरल झालेले बघायला मिळाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!