राजूरला 9 डिसेंबरला देशी व डांगी जनावरांचे प्रदर्शन

0

राजूर (वार्ताहर)- अकोले तालुक्यातील राजूर येथे देशी व डांगी जनावरांचे तसेच शेतमालाचे भव्य प्रदर्शन 9 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती राजूरच्या सरपंच हेमलताताई पिचड यांनी दिली आहे.

 

सालाबाद प्रमाणे राजूर येथील देशी व डांगी जनावरांचे तसेच शेतीमालाचे राज्यस्तरीय प्रदर्शन 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2017 या कालावधीत पार पडणार आहे. शनिवार व रविवार 9 व 10 डिसेंबर रोजी स्पर्धेत भाग घेणार्‍या जनावरांची नावनोंदणी होणार आहे. सोमवार 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत डांगी व संकरीत जनावरांची निवड केली जाणार आहे.

 

दुपारी 3 ते 5 वाजता बक्षिस वितरण आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव पिचड, नाशिक आदिवासी विभागाचे प्रभारी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण हरिश्चंद्रे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे आदींसह चाळीस गाव डांगाणातील सरपंच उपस्थित राहणार आहे.

 

संपूर्ण राज्यात राजूर येथील प्रदर्शन प्रसिद्ध असून राज्यभरातून शेतकरी जनावरे व शेतीमाल येथे विक्रीसाठी आणतात. तमाशा, रहाटपाळणे विविध खेळण्यांची दुकाने अशी अनेक करमणुकीची साधने या प्रदर्शनमध्ये असल्यामुळे वडिलधारी मंडळींबरोबर बालगोपाळांची मोठी गर्दी होते. सर्व शेतकरी बांधवांनी राजूर येथील प्रदर्शनास जनावरे व शेतीमाल आणावा, असे आवाहन राजूर ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*