गुजरात प्रचाराच्या पार्श्वभूमीवर वसुंधराराजेंचे शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरला साकडे?

0

देशदूत डिजिटल विशेष

त्र्यंबकेश्वर /शिर्डी ता. २७ : राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि भाजपाच्या नेत्या वसुंधराराजे शिंदे यांनी आज सायंकाळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन तेथे पूजा आणि अभिषेक केला. तत्पूर्वी त्या दुपारी शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. गुजरात निवडणूक प्रचाराच्या स्टार प्रचारक म्हणून वसुंधराराजेंकडे पाहिले जात असून प्रचारापूर्वी आशीर्वाद घ्यावा या उद्देशाने त्यांनी आजचा हा धार्मिक दौरा केल्याची चर्चा त्र्यंबकेश्वर येथील भाजपा वर्तुळात होती.

भारतीय जनता पार्टीसह अनेक पक्षांच्या नेतेमंडळींची त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीवर श्रद्धा असल्याचे त्यांच्या यापूर्वीच्या दर्शनातून दिसून आले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री व भाजपाचे नेते शिवराजसिंह चौहान नियमितपणे त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला येत असतात. केंद्रीय मंत्री उमा भारती याही अधूनमधून येथे दर्शनासाठी येतात.

मात्र वसुंधराराजे सिंधीया या मागील पाच वर्षांपूर्वी येथे दर्शनासाठी आल्या होत्या. त्यानंतर गुजरात निवडणूकांच्या प्रचार काळातच त्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला आल्याने गुजरात निवडणूकीपूर्वी आपला प्रचार सफल व्हावा आणि भाजपाला तेथे निर्विवाद यश मिळावे यासाठी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केल्याचे भाजपाच्या काही कार्यकर्त्यांकडून खासगीत सांगितले जात आहे.

भाजपातील संघटन संकेतांनुसार केंद्रातील मंत्री आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मान्यवर नेते निवडणूक असलेल्या राज्यात प्रचारासाठी जात असतात. महाराष्ट्रात २०१४च्या विधानसभा निवडणूकीसाठी मराठवाड्यातील सिल्लोडसह काही मतदारसंघांत प्रचारासाठी वसुंधराराजे आलेल्या होत्या.

तसेच त्यानंतर दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणूकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथील मराठीबहुल भागांत प्रचार केला होता.

त्याच प्रमाणे तोंडावर आलेल्या गुजरात निवडणूकीसाठी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातूनही काही मान्यव भाजपा नेते, खासदार, मंत्री प्रचारासाठी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

LEAVE A REPLY

*