Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराजस्थानचा पंजाबवर विजय

राजस्थानचा पंजाबवर विजय

अबुधाबी । वृत्तसंस्था

राजस्थान रॉयल्स विरुध्द किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानच्या संघाने बाजी मारली .

- Advertisement -

नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलची तुफान फटकेबाजी, आणि लोकेश राहुल व निकोलस पूरन यांनी त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर पंजाबने राजस्थानविरुद्ध सामन्यात १८५ धावांपर्यंत मजल मारली आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करत असताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी शतकी भागीदारी करतसंघाची बाजू लावून धरली. राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत ख्रिस गेलने ६३ चेंडूत ९९ धावांची खेळी केली.

आपल्या झंजावाती खेळीत गेलने ६ चौकार आणि ८ उत्तुंग षटकार लगावले. मैदानात षटकारांचा पाऊस पाडत ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार षटकार मारण्याचा विक्रम पूर्ण केला.

१८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनेही आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर बेन स्टोक्स आणि रॉबिन उथप्पा यांनी पहिल्या षटकापासूनच पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत फटकेबाजीला सुरुवात केली. बेन स्टोक्सने आक्रमक पवित्रा आजमावत २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या.

ही जोडी राजस्थानला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच स्टोक्स जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर सॅमसन आणि उथप्पा यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडल्यानंतर राजस्थानचा संघ स्थिरावतोय असं वाटत असतानाच मुरगन आश्विनने उथप्पाला माघारी धाडत राजस्थानला आणखी एक धक्का दिला. उथप्पाने ३० धावा केल्या.

सलामीवीर बेन स्टोक्सचं अर्धशतक, संजू सॅमसनची फटकेबाजी या जोरावर राजस्थान रॉयल्सने आक्रमक खेळी करत किंग्ज इलेव्हन पंजाबचा विजयरथ रोखला आहे. विजयासाठी मिळालेलं १८६ धावांचं आव्हान राजस्थानने ३ गडी गमावत पूर्ण केलं.

स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यामुळे यापुढे प्ले-ऑफची शर्यत अधिक रंगतदार होणार आहे. राजस्थानकडून बेन स्टोक्सने ५० तर संजू सॅमसनने ४८ धावांची खेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या