आंबीत भरले, मुळा वाहती

0
पिंपळगाव खांड भरण्याच्या मार्गावर, रतनवाडीत 6 इंच पाऊस

कोतूळ (वार्ताहर)- मुळा धरण पाणलोट क्षेत्रात अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या घाट माथ्यावर कालपासून पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे आंबीत धरण ओव्हरफ्लो झाले. या वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पहिल्यांदा धरण भरण्याचा मान आंबीत धरणाला मिळाला आहे. मुळा नदीच्या उगमावर असणार्‍या या धरणाच्या सांडव्यावरून 700 क्युसेसचा विसर्ग सुरु आहे. यामुळे मुळा नदी आता वाहती झाली आहे गत वर्षी आंबीत धरण 16 जून 2016 रोजी ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी आठ दिवस उशिराने धरण भरले आहे

मान्सूनची लांबलेली प्रतीक्षा आता संपली. शुक्रवार पासून मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील घाट माथ्यावर काळ्या ढगांची गदी होऊन अचानक पावसाला सुरवात झाली काल त्यात आणखी वाढ झाली. मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबीत, पाचनई, कुमशेत, जानेवाडी, हरिश्चंद्रगड, कोथळा, लव्हाळी, या भागात जोरदार पाऊस कोसळत होता. यामुळे मुळा नदी पात्रात पाण्याची आवक सुरु झाली आहे. मुळा नदीच्या उगमावर असणारे 194 दलघफू क्षमतेचे आंबित धरण शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता ओव्हरफ्लो झाले. नदीपात्रातील धरणाचे सांडव्या वरून 700 क्युसेक्सने विसर्ग सुरु झाला आहे.

नदी प्रवाहित झाल्याने शेतकरी आनंदी झाला आहे नदीचा हा प्रवाह आता कोतूळ जवळ असणार्‍या पिंपळगाव खांड धरणाच्या दिशेने झेपावू लागला आहे. आज सायंकाळी या धरणात पाण्याची आवक सुरु झाली. दोन दिवसांत पिंपळगाव खांड धरण भरल्या नंतर नदीचा प्रवाह मुळा धरणाकडे आगेकूच करील 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण दोन दिवसांत ओव्हरफ्लो होऊ शकते. सोमवारी किवा मंगळवारी पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे धरणात पाणी साठा होत जाईल तसा कोतूळचा पूल पाण्याखाली जाण्यास सुरवात होत आहे. यामुळे कोतूळ पूल पाण्याखाली जाण्याची आता काही तासांची प्रतीक्षा उरली आहे.

निळवंडेतून पाणी पिण्याचे आवर्तन सोडणार
निळवंडे धरणात 611 दलघफू पाण्याचा साठा असून भंडारदरा धरणात 1840 दलघफू पाण्याचा साठा आहे. भंडारदरा धरणात नव्याने 250 दलघफू पाण्याची आवक झाली आहे. पूर्व भागातील पाण्याची मागणी लक्षत घेऊन निळवंडे धरणातून सोमवार पासून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले निळवंडे धरणातील 400 ते 500 दलघफू पाणी या आवर्तनात खर्च होणार आहे.

भंडारदरा (वार्ताहर)- भंडारदरा पाणलोटात शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने धरणाकडे पाण्याचा लोंढा येत असून धरणात सामावत आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 2168दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे.पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या रतनवाडीत शनिवारी धो धो पाऊस कोसळला. पण पाणलोटात रविवारी या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाकडे येणार ओघ थंडावला आहे.
या पावसामुळे डोंगरकर्‍यांवरील धबधबे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ओढेनाले भरभरून वाहत असून धरणात विसावत आहेत. शनिवारी धरणात पाण्याची जोरदार आवक झाली. पण नंतर पाऊस कमी झाल्याने पाण्याची आवक मंदावली. काल भंडारदरा परिसरात 13 मिमी पावसाची नोंद झाली. 

भंडारदरा पाऊस (मिमी)-  भंडारदरा 91, घाटघर 99, पांजरे 102, रतनवाडी 158, वाकी 96.

धरणात अशी झाली पाण्याची आवक (दलघफूमध्ये) – भंडारदरा
20, दारणा 70, गंगापूर 124, कुकडी 434

 

LEAVE A REPLY

*