पावसाचा जोर ओसरला; नाशिक जिल्ह्यात 50 मिमी पाऊस; धरणातून विसर्ग

0

नाशिक । दोन आठवड्यांपासून मुसळधार बरसणार्‍या पावसाचा जोर काहीअंशी कमी झाला असला तरी पुढील 48 तासांत मुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज जिल्ह्यात नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या चार तालुक्यांत 59.7 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. धरणातून मात्र विसर्ग सुरू असून पावसाचा जोर कमी विसर्गही कमी करण्यात आला आहे.

गंगापूर धरणातून 2068 क्यूसेकने कपात झाल्याने सध्या 832 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर दारणा धरणातून तब्बल 10 हजार क्यूसेकने कपात झाली असून सध्या अवघा 550 क्यूसेक इतकाच विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

त्यामुळे जुलैच्या दुसर्‍या, तिसर्‍या आठवड्यातच धरणांनी पातळी गाठली आहे. शिवाय धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा प्रभाव कायम राहिल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक धरणांत होत आहे. परिणामी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली आहे.

दारणात 15 ते 20 हजार क्यूसेकने आवक होत असल्याने त्यातून 11 हजार क्यूसेक इतक्या वेगाने विसर्ग करावा लागला. तर गंगापूरमध्ये 5 हजार आसपास आवक होत असल्याने आणि धरणही 75 टक्क्यांवर पोहोचल्याने लागलीच त्यातून महत्तम 2900 क्यूसेकने विसर्ग करावा लागला.

कडवातूनही रविवारी एक हजार क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला. हे सर्व पाणी तसेच नद्या-नाल्यांतून येणार्‍या पाण्यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली.

त्यामुळे त्यातून रविवारी काही तासांसाठी 51 हजार क्यूसेकने पाण्याचा पाटबंधारे विभागाला करावा लागला. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने आता त्यात कपात केली जात आहे. गंगापूरचा विसर्ग 2900 क्यूसेकवरून गुरुवारी कपात करत थेट 832 क्यूसेक इतका म्हणजे 2068 क्यूसेकने कमी झाला आहे.

दारणाचा विसर्ग 11 हजार क्यूसेकवरून हळूहळू कमी करत आता 550 क्यूसेक इतकाच सुरू आहे. त्याचबरोबर नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून 3228 क्यूसेक इतका विसर्ग सुरू असून पाऊस कमी-अधिक झाल्यास त्यानुसारच विसर्गही कमी-अधिक केला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*