पावसाचा सोयाबीन, बाजरीला फटका

वजनात घट; दर्जा खालवून होणार नुकसान

0

नाशिक | दि. १० सोमनाथ ताकवाले- जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून परतीच्या पावसाची सुरू असलेली रिपरिप खरीप हंगामातील तयार पिकांना धोकादायक ठरण्याची शक्यता वाढली आहे. सोयाबीन आणि बाजरी सोंगणीच्या टप्प्यात असल्याने पावसाने काळवंडणार आहे. सोयाबीन शेंगांना तडे जाऊन बी गळून जाणार आहे.

तर सोंगणी केलेल्या बाजरीच्या कणसांना चौरे फुटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा हवामानात बदल घडवून आणला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण, दुपारी पावसाची जोरदार सुरुवात तर रात्री गारठ्याचा प्रभाव असल्याने विचित्र वातावरणाचा अनुभव येत आहे. त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना आता बसू लागला आहे.

बाजरीला तुरे : जिल्ह्यात पूर्व भागात बाजरी, कापूस, तूर, मका आणि सोयाबीन लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. तर सिन्नर, निफाड भागातही बाजरी काही प्रमाणात आहे. पावसाची रिपरिप कायम आहे. शिवारात काही प्रमाणात बाजरी असून सोंगणी होणे बाकी आहे.

पाऊस सतत होत असल्याने उभ्या बाजरीला त्याचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. बाजरीचे ताटवे वाकून पडल्यामुळे कणसे खराब होऊन बाजरीचा दर्जा खालवणार आहे. तर सोंगणी करून तयार करण्यासाठी शेतात झाकून ठेवण्यात आलेल्या बाजरीच्या कणसांना कोंब फुटून बाजरीच्या दाण्यांना त्यामुळे क्षती पोहोचणार आहे. त्यामुळे बाजरी उत्पादक शेतकरी परतीच्या पावसाने चिंताग्रस्त झाले आहेत.

सोयाबीन तडकणार
सोयाबीन पिकाला कीड, नैसर्गिक संकटे यापासून वाचवत खरीप हंगामात शेवटच्या टप्प्यात सोंगणीवेळीच पावसाने झटका दिला. सोयाबीनच्या शेंगा वाळलेल्या असताना त्या तडकून त्यातील दाणे शेतात गळून पडण्याची घटना पावसामुळे घडत आहे. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान वजन घटण्यातून दिसून येणार आहे.

त्याचबरोबर पावसाने ओले झालेले सोयाबीन काळे पडणार असून त्याचा दर्जा खालवणार आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कांदा रोपे रुजण्यावर परिणाम
लाल कांद्याची लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांनी कांदा रोपे तयार केली आहेत. या कांद्याची लागवड शेतकर्‍यांनी जिल्ह्यात काही प्रमाणात केली आहे. मात्र सतत पाऊस होत असल्याने लाल कांद्याची शेतात लावलेली रोेपे पावसाच्या पाण्याने तळे झाल्यामुळे जमिनीत रुजत नसल्याचे चित्र आहे. कांद्याची रोपे लागवड केल्यानंतर मुळे धरत नसल्याने परतीच्या पावसाबद्दल शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

LEAVE A REPLY

*