Video : वरुणराजा, तूच जा संपावर…बॅनरद्वारे शेतकर्‍यांनी व्यक्त केला उद्वेग

0
नाशिक : आम्ही आतापर्यंत हातावर भाग्यरेषा शोधली, मनगटावर घड्याळ बांधून पहिले, शिवशाहीचा धनुष्यबाणही उचलून पहिला, पर्याय म्हणून कमळाचे फूलही हातात घेतले.

यांनी आम्हाला काय दिले? आत्महत्येसाठी एक विषाची बाटली व गळफास घेण्यासाठी दोरखंड. वरुणराजा, आता तूच संपावर जा. म्हणजे आम्ही कर्ज काढून काही पेरणारही नाही, शेतात खतेही टाकणार नाही.

…जर तू आलास तर दिवाळीच्या वेळी आमचा शेतमाल मातीमोल किमतीत मार्केटला विकलाही जाणार नाही किंवा त्याबदल्यात आम्हाला कागदाचा तुकडा म्हणजेच अनेक दिवस न वठणारा चेकही मिळणार नाही. हे वरुणराजा, आता तूच संपावर जा म्हणजे आमचा कर्जाचा डोंगर मोठा होणार नाही.

– तुझाच पिचलेला शोषित शेतकरी.
अशा उपरोधित आशयाचे बॅनर लखमापूरनजीक मालेगाव-सटाणा रस्त्यावर झळकवून येथील शेतकर्‍यांनी वरुराजाला बरसू नको, असे साकडे घातले आहे. कर्जमुक्तीवर तोंडावर बोट ठेवणार्‍या सरकारला धडा शिकवण्यासाठी लखमापूर, धांद्री गावातील शेतकरी एकत्र आले. त्यांनी आज येथे यज्ञ करून अग्निदेवतेला विनंती करत पावसाला बरसू देऊ नको, असे साकडे घालून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा प्रयत्न केला आहे.

शेतमाल मातीमोल किमतीत विकण्यापेक्षा कुणीही बाजारपेठेत विकण्यासाठी पेरण्या करू नयेत. फक्त स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी लागेल एवढाच भाजीपाला, धान्य, पिकवावे. शेतीमाल काढण्यासाठी लागलेला खर्चही निघत नसेल तर अशी शेती करायची तरी कशी? सरकारच्या भरवशावर राहून कुणीही मार्केटला आता शेतमाल घेऊन जाऊ नये.

त्यामुळे येथील शेतकरी आता कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) पट्ट्यात शेतकर्‍यांना घरात लागेल एवढाच शेतीमाल पिकवण्यासाठी आवाहन करणार आहे. यामध्ये तरुण शेतकर्‍यांसह साठी ओलांडलेल्या वृद्ध शेतकर्‍यांचाही समावेश आहे. 1 जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. या संपातदेखील येथील शेतकरी सहभागी होणार आहेत.

हमीभाव पाहिजे : शेतीमालाला हमीभाव पाहिजे. तरच शेतकरी उभा राहील. आज मार्केटमध्ये विक्रीला घेऊन गेलेला शेतीमाल ट्रॅक्टरचे भाडे वजा जाता एक रुपयादेखील शेतकर्‍याच्या खिशात पडत नाही. त्यामुळे हमीभाव मिळावा. शेतकरी आता बदलाची अपेक्षा करत असून त्यांनाही संपावर जाता येते, हे शेतकरी दाखवून देतील.
– चिंतामण शिरोळे, शेतकरी, निवृत्त पोलीस अधिकारी

LEAVE A REPLY

*