Type to search

Featured सार्वमत

पाऊस गायब झाल्याने शेतकरी धास्तावला

Share

1 लाख 87 हजार हेक्टरवरील अंकुरलेली पिके धोक्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)- यंदा उशीरा सुरू झालेला पाऊस वाकुल्या दाखवून पुन्हा गायब झाला आहे. जिल्ह्यात काही भागात दमदार तर काही ठिकाणी पेरणीलायक पाऊस झाला असून पेरणीनंतर जिल्ह्यातून जवळपास सर्वच भागातून पाऊस हद्दपार झाला आहे. सोसाट्याचा वारा आणि धावणारे आभाळ पाहून शेतकर्‍यांच्या डोळ्यांना अंधार्‍या येण्याची वेळ आली असून 1 लाख 87 हजार 171 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून अंकुरलेल्या पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. काही ठिकाणी डोक्यावर पाणी नेऊन तर काही ठिकाणी टँकरने पाणी नेऊन पिके वाचविण्याची धडपड शेतकरी करताना दिसत आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात खरिप हंगामात 35 टक्के क्षेत्रावर पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने पाठ फिरविली असल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, कमी पावसाचा फटका यंदा खरीप हंगामाला बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कृषी विभागाने यंदा 4 लाख 78 हजार 638 हेक्टर क्षेत्राचे नियोजन खरीप हंगामासाठी केले आहे. परंतु आतापर्यंत 1 लाख 87 हजार 171 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा पाऊस लांबल्याने मुगाच्या पेरणीचा मोसम निघून गेला आहे. दमदार पाऊस नसल्याने ज्याठिकाणी पेरण्या झाल्या त्याठिकाणी पिकांची परिस्थिती नाजूक झाली आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरिपापाठोपाठ रब्बी हंगाम देखील वाया गेला होता. गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अतियश कमी पावसाची नोंद झाली होती. 63 टक्के पाऊस पडल्याने ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात पाणी व चारा टंचाई तोंड देत आहे. जुनच्या महिन्या आठवड्यानंतर परिस्थती बदलेल असे वाटले होते. पण हा महिना देखील कोरडा गेला.

जिल्ह्यात आषाढी एकादशीपासून दमदार पाऊस सुरू होत असल्याचा इतिहास आहे. मात्र, आषाढी एकादशीपासून जिल्ह्यात ऊन पडत असल्याने पाऊस गायब झाल्यासारखी परिस्थिती आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 167 मिमी म्हणजे सरासरीच्या 34 टक्के पाऊस झाला आहे.

अशी झाली आतापर्यंतची पेरणी
भात 224 हेक्टर, बाजरी 42 हजार 200 हेक्टर, रागी/ नागली 195 हेक्टर, मका 17 हजार 629 हेक्टर, इतर खरिप तृणधान्ये 148 हेक्टर, तूर 13 हजार 37 हेक्टर, मूग 9 हजार 254 हेक्टर, उडिद 9 हजार 323 हेक्टर, कडधान्ये 1 हजार 962 हेक्टर, भुईमूग 1 हजार 436 हेक्टर, तीळ 84 हेक्टर, कारळे 318 हेक्टर, सुर्यफूल 5 हेक्टर, सोयाबीन 14 हजार 255 हेक्टर, कापूस 60 हजार 441 हेक्टर, चारा पिके 13 हजार 8 हेक्टत, कांदा 2 हजार 184 हेक्टर, भाजीपाला 875 हेक्टर, फुलपिके 112 हेक्टर, ऊस 394 हेक्टर.

धरणांमध्ये पाणी धीम्या गतीने
नगर जिल्ह्यातील शेती आणि जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने भवितव्य असलेल्या मुळा, भंडारदरा, निळवंडे, दारणा आणि कुकडी प्रकल्प क्षेत्रातील पाऊस थांबल्याने या धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक अतिशय धीम्या गतीने होत आहे. त्यामुळे पाणलोटातही चिंता व्यक्त केली जात आहे. शनिवारनंतर मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तो जर खरा ठरलातर या पिकांना जीवदान मिळणार आहे.

भाजीपाला महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले
बाजारात बहुतांश भाजीपाल्याचे दर 100 रुपये किलो झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. यामुळे तर गृहिणींचे घरातील बजेट कोलमडून गेले आहे. त्यांना खर्चाचा मेळ घालता घालता नाकीनऊ आले आहेत. महागाईचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. त्यामुळे भाजीपाला व्यापार्‍यांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. नगर जिल्ह्याच्या विविध भागात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने जवळपास सर्वच भाजीपाल्याने शंभरी गाठली आहे. बाजारात भेंडी, गवार, टोमॅटो, ढोबळीसह भाजीपाल्यासाठी प्रतिकिलो 80 ते 100 रुपये मोजावे लागत आहेत. तर पालक, मेथीसह भाजीच्या दोन जुड्या 50 ते 60 रुपयांना होत्या. कोथिंबीरही कडाडली आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने आता गृहिणी भाजीपाला खरेदीला फाटा देत कडधान्ये खरेदी करण्याला पसंती देत आहेत. मठ, हरभरा, वाटाणा, तूरडाळ, मूगडाळसह बेसन खरेदी करीत आहेत. अनेक भाज्यांच्या गड्डी अतिशय लहान असल्याने ग्राहक कडधान्ये खरेदी करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!