अकोलेत विजांचा कडकडाट तर वीरगावात पावसाच्या हलक्या सरी, कांदा उत्पादकांची धावपळ

0
अकोलेत विजांचा कडकडाट तर वीरगावात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांची अशा प्रकारे कांदा झाकण्यासाठी धावपळ सुरू होती.

अकोले (प्रतिनिधी) – अकोले शहर व परिसरात सायंकाळी विजांचा कडकडाट सुरू झाला. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी चिन्हे असल्याने ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांची शेतात काढलेला कांदा झाकण्याची लगबग पाहायला मिळाली.

अकोले तालुक्यातील वीरगाव परिसरात सायंकाळच्या सुमारास पावसाच्या किरकोळ सरी कोसळल्या. अकोले शहर व परिसरात सायंकाळ नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. कांदा उत्पादक शेतकरी यांची कांदा झाकण्यासाठी शहरातील कागद विक्रेत्यांकडे प्लॅस्टिक कागद खरेदीसाठी गर्दी पाहावयास मिळाली.

वीरगावात पावसाचा किरकोळ शिडकावा –  वीरगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात वीरगाव परिसरात पावसाच्या किरकोळ सरी बरसल्या.
ढगांची आकाशात गर्दी झाली आणि गडगडाट सुरू झाल्यानंतर पाऊस बर्‍यापैकी येईल अशी अपेक्षा होती मात्र वारा सुटल्याने ढग वाहून गेल्याने किरकोळ शिडकावा झाला. दिवसभराच्या उकाड्याने त्रस्त झालेल्या वीरगावकरांना गारव्याचा हलकासा सुखद अनुभव आला.
पाण्याच्या तुटवड्यात कसाबसा उन्हाळी कांदा शेतकर्‍यांनी पिकविला. बाजारभाव नसले तरी शेतात काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ उडाली होती. पाऊस नसला तरी सायंकाळी बराच वेळ ढगांचा गडगडाट चालूच होता.

LEAVE A REPLY

*