Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

परतीचा पाऊस शेतकर्‍यांच्या ‘मुळावर’

Share

पढेगाव (वार्ताहर) – हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. सध्या सर्वत्र खरिपातील बाजरी, सोयाबीन, मका पिकांच्या सोंगणीचे कामे वेगाने सुरु आहे. त्यामुळे परतीचा पाऊस शेतकर्‍यांच्या मुळावर असून हा पाऊस नुकसानीचा ठरणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर मजूर टंचाई व सोंगणीचे वाढते भाव यामुळे शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे.

चालू वर्षी पावसाने सुरुवातीलाच ओढ दिल्याने खरिप पिकांच्या पेरण्यास उशिराने प्रारंभ झाला. तालुक्यात साधारणपणे दोन टप्प्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. मात्र जुलै-ऑगस्ट मध्येही पावसाअभावी अनेक ठिकाणी खरिप पिकांना फटका बसला. तर रिमझिम पावसावर खरिपाची पिके तरली मात्र उत्पन्नात घट आली आहे. मात्र ऑगस्टच्या शेवटी व सप्टेबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत बर्‍यापैकी वाढ झालेली आहे.
सध्या खरिपातील सोयाबीन, मका, बाजरी पिकांच्या सोंगणीची कामे वेगाने सुरु आहे. मात्र कष्टाने व मोठ्या प्रमाणात खर्च करुन आणलेली पिके एैन काढणीच्या वेळेस परतीच्या पावसाचे संकट डोक्यावर आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच सर्वत्र सोंगणीची कामे एकाच वेळेस सुरू असल्याने मजुरांचीही मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. 3500 ते 4 हजार रुपयांपर्यंत सोंगणीचे भाव गेले आहे. त्यामुळे अगोदरच पावसाचे संकट त्यात मजूर मिळत नसल्याने अनेक भागात सोयाबीन, बाजरी पिके काढणीस उशिर होत असल्याने नुकसान होत आहे.

चालू वर्षी शेवटच्या नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने पाणी पातळीत बर्‍यापैकी वाढ झालेली आहे. तसेच भंडारदरा धरणही भरलेले असल्याने यावर्षी रब्बी पिकासाठी व उन्हाळी आवर्तन मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी रब्बी पिकांचे नियोजन आखले आहे. त्यामुळे खरिप पिकांच्या सोंगणीची कामे उरकून कांदा, गहू, हरभरा पिके घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र एैन सोंगणीचे कामे सुरु असतानाच पावसाचे वातावरण तयार झाले आहे. हा परतीचा पाऊस झाला तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र सोयाबीन, बाजरी काढणीचे कामे उरकण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!