पावसामुळे खरीपाचे नुकसान

0

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात यावे, शेतकर्‍यांची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- परतीच्या पावसाने खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान केले असून शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने खरीपातील सोयाबिन, कपाशी, बाजरी, मका आदी पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे आधिच कर्जबाजारी असलेला शेतकरी आता आणखीच अडचणीस सापडला आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही केलेली नाही.
परंतू आता या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्यात येवून दिवाळीच्या आत नुकसान भरपाई देण्यात येवून शेतकर्‍यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.
परतीच्या पावसाने श्रीरामपूर तालुक्यातील गोदापट्टयातील नाऊर, जाफराबाद, रामपूर, सरला, गोवर्धन तसेच महांकाळ वडगाव, माळवडगाव, मुठेवडगाव आदी भागासह टाकळीभान, खोकर, भोकर, खंडाळा, कारेगाव, मातापूर, मालुंजा आदी भागासह संपुर्ण श्रीरामपूर तालुक्यात परतीच्या पावसाने खरीपाच्या पिकांची दानादान उडविली आहे.
शेतात पाणी साचल्याने सोयाबिन काढणे मुश्किल झाले आहे तर बाजरीचे पिक भुईसपाट झाले आहे. तर कपाशीची वेचणीच करता येत नाही. शेतात पाणी असल्याने कपाशीची कशीबशी वेचनी करण्यासाठी मजुरांना तयार केले तर ते 10 ते 12 रूपये किलो प्रमाणे मजुरी मागत आहे. त्यामुळे शेतकरी अगदी अडचणीत सापडला आहे.
पाण्यातील सोयाबिन सोंगणीसाठी मजुर तीन ते साडेतीन हजार रूपये मजुरी मागत आहे. तर मळणी मशिनवाले सुध्दा दिडशे रूपये पोते घेतात. सर्व खर्च वजा जाता शेतकर्‍याच्या हातात केवळ मातीच येत आहे.
त्यातच शासनाने सोयाबिनच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण केल्याने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला आहे.
आता या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्यात येवून दिवाळीच्या आत नुकसान भरपाई देण्यात येवून शेतकर्‍यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

 

LEAVE A REPLY

*