Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पुढील 48 तासांत मुसळधार!

Share

वेधशाळेचा अंदाज । प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी) – दोन दिवसांत पावसाने हजेरीत सातत्या दाखविल्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजे 48 तासांत जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. पावसासोबत वादळाचाही जोर असेल, असा अंदाज असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शनिवारी नगर, राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.

शनिवारपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. शनिवारी नगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांतही मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवारीही पावसाचा जोर कायम राहणार आहे. शनिवारी श्रीरामपूर व नगर तालुक्यांत पावसाने चांगली हजेरी लावली. सोमवारी जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहील, असा अंदाज आहे. जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्यानेे जिल्हा प्रशासनानेे सावधानतेचा इशारा दिला आहे. या पावसासोबत विजांचे जोरदार तांडव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादळ आणि पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी निवारा घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

धुव्वाधार पावसाने नगरची दाणादाण

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहराला शनिवारी दुपारी 4 ते सायंकाळी साडेपाचपर्यंत धुव्वाधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने शहर आणि उपनगरात दाणादाण उडाली. सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवरून पाणी वाहत होते. अनेक ठिकाणी दुचाकी वाहने घसरून अपघात झाले. शहरातील पोलीस अधीक्षक चौकात नाशिक-नगर या चालत्या एसटी बसवर झाड कोसळ्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

हवामान खात्याच्या मुंबई विभागाने शनिवारी नगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजांच्या कडकाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. शनिवारी नगर शहरात सकाळपासून उन्हाचा चटका वाढलेला होता. दुपारनंतर अचानक आकाशात ढगांनी गर्दी केली. साधारण शहरातील विविध भागात दुपारी साडेतीननंतर पावसाला सुरूवात झाली. मात्र, दुपारी चारनंतर पावसाचा जोर अचानक वाढला. जोरदार कडाक्यासह वीजांचा गडगडाटांसह शहरातील विविध भागात पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. पावसाचा वेग जबरदस्त होता. यामुळे सुरूवातीच्या काही मिनीटात शहरातील सखल भागात पाणी साचले.

पुढील दीड तास शहर आणि उपनगरात पाऊस कोसळत होता. यामुळे रस्त्याावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. जोरदार पावसामुळे वाहन चालकांना समोरचा रस्ताच दिसत नव्हता. यामुळे नगरकारांनी मिळेल त्या ठिकाणी थांबने पंसत केले. पावसामुळे नगर-औरंगाबाद रोड, कल्याण रोड, नालेगाव, दिल्ली दरवाजा, चितळे रोड, चौपटी कारंजा, कोर्ट गल्ली, बालीकाश्रम रोड, उपनगरातील रस्ते यांना नदीचे स्वरूप आले होते. या ठिकाणी अनेक चारचाकी वाहने निम्म्याने पावसाच्या पाण्यात बुडाल्या होत्या. सर्वात जास्त पाणी निलक्रांती चौकात होते. त्या ठिकाणी दुचाकी निम्म्या बुडाल्या होत्या. कोहीनूर मंगल कार्यलया शेजारी असणारे गाळ्यात दहा फुट पाणी साचले होते.

कल्याण रस्त्यावर अनेक घरात पावसाचे पाणी घुसले होते. अशीच परिस्थिती नागापूर, बोल्हेगाव परिसारात होती.
पोलीस अधीक्षक चौकाजवळ नाशिक-नगर या चालत्या एसटी बस क्रमांक एमएच 06. 8458 वर झाड कोसळे. यात कोणाला इजा झाली नसली तरी वाहतूकीचा चांगलाच खोळंबा झाला होता. अखेर मशिनच्या साह्याने झाडाच्या फांद्या कापून एस.टी.ला बाहेर काढण्यात आले. नगर महाविद्यालय परिसारात रस्त्यावर पाणी साचल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील सावेडी, पाईपलाईन रोड, निर्मल नगर, गुलमोहर रोड, भिंगार, नागरदेवळे, औरंगाबाद रोड या ठिकाणी पावसाने दाणादान झाली.

सीना वाहती
यंदा पहिल्यांदा शहर आणि परिसारात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहती झाली. शहरातील जवळपास सर्वच पाणी सीना नदीत वाहनू जात असल्याने शिराढोण जवळ सीना नदीने रौद्र रुप धारण केले होते. पावसाचा असाच जोर राहिल्यास सीनेला पुर येण्याची शक्यता आहे.

श्रीरामपूर, राहुरीत पिकांना जीवदान

श्रीरामपूर/राहुरी (प्रतिनिधी)- पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र अजूनही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शनिवारी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान, बेलापूर, उंबरगाव, पढेगाव, मातापूर, खंडाळा, अशोकनगर, वडाळा महादेव, भोकर, खोकर, घुमनदेव, वांगी खिर्डी, गुजरवाडी, कारेगाव, उक्कलगाव या भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दडी मारलेल्या पावसाने दुपारी श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यांतील अनेक भागात हजेरी लावली. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने पेरणी झालेल्या पिकांचा उतार होताना दिसत नव्हता. त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणीच्या संकटाने ग्रासले होते. शनिवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यात पावसाचे वातावरण तयार होऊन पाऊस सुरु झाला. सुरुवातीला जोरदार असलेल्या पावसाचा वेग दहा ते पंधरा मिनिटात मंदावला. सर्वत्र काळे ढग होते. त्यामुळे चांगला पाऊस होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र पंधरा ते वीस मिनिटानंतर पावसाने विश्रांती घेतली. तरीही या पावसाने शेतकरी काहीसा सुखावला आहे. खरीप पेरणी केलेल्या पिकांची उगवण तरी चांगली होईल, याचे समाधान शेतकर्‍यांत होते. दमदार पावसाची अद्याप प्रतिक्षा आहे.

पूर्व गोदाकाठ परिसरातही पावसाने हजेरी लावली. हलक्याशा पावसाच्या सरीने जमिनीतून बाहेर पडत असलेल्या कपाशीच्या कोवळ्या पिकांना आधार झाला. मात्र मोजक्या ओलीवर मोठ्या हिंमतीने खरिप पेरणी केलेल्या सोयाबीन, मका, बाजरी या पीकास मात्र मोठ्या पावसाची गरज आहे. काही ठिकाणी रात्री पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या.

दरम्यान, राहुरी तालुक्यातील पूर्व भागात दमदार पावसाने हजेरी लावली. मानोरी, देवळाली, वाघाचा आखाडा, राहुरी स्टेशन, गावठाण, तांदुळवाडी, केंदळ आदी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर टाकळीमिया परिसरात तुरळक पावसाची हजेरी होती. या पावसाने आशा पुन्हा पल्लवित केल्या असून कपाशी आणि सोयाबीन पेरणीला जीवदान मिळणार आहे.

श्रीरामपुरात पुलाखाली पाणी साचल्याने वाहतुक कोंडी
श्रीरामपूर शहरात दीड वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अर्धा तास झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. शिवाजी चौकातील रेल्वे पुलाखाली तसेच कॉलेज रोडवरील भुयारी पुल याठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे बराच वेळ दोन्ही मार्ग बंद होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यात विद्यार्थ्यांचेही हाल झाले.

पावसामुळे गोदावरीला पुन्हा पाणी

पाणलोटात मध्यम पाऊस दारणा 71, भावली 81 टक्के गंगापूरमध्ये 55 टक्के पाणी साठा

अस्तगाव (वार्ताहर) – निफाड, सायखेडा परिसरात पाउस झाल्याने पाणी नांदूरमधमेश्‍वरमध्ये दाखल झाले. गोदावरीला शनिवारी पहाटे 3 वाजता सुरवातीला 1614 क्युसेकने नंतर दिवसभर 3228 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे गोदावरी पुन्हा प्रवाहित झाली आहे.

शुक्रवारी नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍याच्या पाणलोटात दमदार पाऊस झाल्याने हे पाणी नांदूरमधमेश्‍वर बंध्यार्‍यात दाखल झाले. या आगोदरच कोठाकाठ भरलेल्या या बंधार्‍यात नवीन पाण्याची आवक झाल्याने गोदापात्रात पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी पहाटे 3 वाजता 1614 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हा विसर्ग सकाळी 9 वाजेपर्यंत टिकून होता. त्यानंतर 3228 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. हा विसर्ग तीन तास टिकून होता. नंतर तो पुन्हा 1614 क्युसेक करण्यात आला. दूपारी तीन वाजता तो कमी करुन 807 इतका करण्यात आला.

सायंकाळी 5 वाजता 200 क्युसेक प्रवाह होता. शनिवारी उशिरा पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने हा विसर्ग रविवारी सकाळी पुन्हा वाढलेला असेल, अशी शक्यता आहे. गोदावरीचे दोन्ही कालवे पिण्याच्या पाण्यासाठी वाहत आहेत. पावसाच्या अल्प प्रमाणामुळे गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट होते.

राज्यात दोन दिवसांपासुन काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्या तुलनेत दारणा, गंगापूर तसेच अन्य धरणांच्या पाणलोटात काल सकाळी संपलेल्या 24 तासात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. शनिवारी नाशिक तसेच अन्य ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

शनिवारी सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात गंगापूर येथे 60 मिमी पावसाची नोंद झाली. त्रंबक येथे 16 मिमी, अंबोली येथे 8 मिमी, काश्यपीला 12 मिमी, पाउस नोंदला गेला. तर काल दिवसभर सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत गंगापूरला 7 मिमी, अंबोली ला 7 मिमी तर कश्यपीला 4 मिमी पावसाची नोंद झाली. 5630 क्षमतेच्या गंगापूर मध्ये 3096 दलघफू पाणीसाठा झाला होता. हे पाणी 54.99 टक्के इतके आहे. रात्रीतून मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.

जलसाठ्यात वाढ
शनिवारी सकाळी दारणा धरणात 24 तासात 47 दलघफू नविन पाणी दाखल झाले. तर भावलीत 13 दलघफू नविन पाणी दाखल झाले. तर गंगापूर मध्ये 27 दलघफू नविन पाणी दाखल झाले. यामुळे काल सकाळी 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 5074 दलघफू पाणी साठा झाला आहे. हे धरण 71 टक्के भरले आहे. 1434 दलघफू क्षमतेच्या भावलीत 1155 दलघफू पाणी साठा झाला आहे. हे धरण 81 टक्के भरले आहे. शनिवारी सकाळी 6 पर्यंत संपलेल्या 24 तासात दारणा येथे 6 मिमी, भावली येथे 17 मिमी, इगतपूरी येथे 21 मिमी, घोटी येथे 35 मिमी पाउस झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!