Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात रात्रभर पावसाच्या सरी; अनेक भागात रिपरिप सुरूच

Share

नाशिक | देशदूत डिजिटल चमू

गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाच्या आगमनानंतर पावसाने दोन-तीन दिवसांची विश्रांती नाशिक जिल्ह्यात घेतली होती. मात्र, मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात चांगला ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्याने ग्रामीण भागासह शहरी भागात गारवा निर्माण झाला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर ग्रामीण भागात रखडलेल्या पेरण्यात शेतकऱ्यांनी आटोपल्या. काही ठिकाणी मात्र, अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने नाराजीचे वातावरण आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात कालपासून संततधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्र्यंबकेश्वरमधील पावसाने भात आवणीला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. परिसर हिरवाईने नटला असून हौशी पर्यटक यापरिसरात फेरफटका मारायला येऊ लागले आहेत.

देवळाली कॅम्प, भगूर परिसरात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी व चिखल असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे सकाळी मोठे हाल झालेत.

सातपूर परिसरात रात्रभर संततधार सुरु होती. सकाळीदेखील संततधार सुरुच असल्याने औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कामगारांची तारांबळ उडाली होती.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये रात्रीपासून समाधानकारक पाऊसाला सुरूवात झाली आहे. परिसरातील रखडलेल्या पेरण्या पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. तर,  पेरण्या झालेल्या भागावर आलेल्या दुबार पेरणीच्या संकट रात्रीच्या पावसाने दूर झालेले दिसून येत आहे.

मनमाड शहरात मात्र, पावसाने दडी मारली आहे. केवळ पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र पावसाचे आगमन झालेले नाही. येथील शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

देवळा तालुक्यातील वाजगाव येथे गेल्या आठ दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने आज (दि.२५) पहाटे पासून रिमझिम सरी बरसल्या.  आठ दिवसापासून दडी मारलेल्या पावसामुळे पिके कोमजली होती. आज पहाटे पासून सुरु असलेल्या हलक्या सरींनी पिकांना दिलासा मिळाला आहे.

बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे परिसरात पावसाचे आगमन झाले असले तरी बागलाणमधील शेतकरी अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

नांदगाव तालुक्यात पावसाचे वातावरण असून अद्याप पावसाच्या सरी मात्र कोसळल्या नाहीत. बोलठाण परिसरात अशीच काहीशी परिस्थिती आहे.  दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड परिसरात पावसाला सुरुवात झाल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त झाली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!