Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मृगाच्या तडाख्याचा अंदाज कोटीच्या घरात

Share

महावितरणसह जिल्हा परिषद शाळा अन् खासगी घरांचे नुकसान

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर, नगर शहर, जामखेड आणि कर्जत या तालुक्यांसह अन्य भागात झालेल्या वादळात मोठ्या प्रमाण नुकसान झाले आहे. यात महावितरण कंपनीच्या उच्च आणि लघू दाबाचे वीजेचे खांब, वीज रोहित्र, जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांची पडझड आणि काही ठिकाणी पत्रे उडाली, खासगी व्यक्तींच्या घरांची पूर्णत: आणि अंशत: पडझड याची आकडेवारी कोटीच्या घरात पोहचली आहे. दुसरीकडे महसूलची यंत्रणा अद्याप पंचानामे आकड्यांच्या खेळात अडकली असून प्रत्यक्षात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पदरात मदतीचे दान कधी पडणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मृग नक्षत्राचा वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. यात मनुष्यहानी टळली असली तरी काही जनावरांचा समावेश आहे. यासह विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या कांदा पिकाच्या नुकसानीचा यात समावेश असून त्यांचे पंचनामे कधी होणार असा सवाल नुकसान झालेल्या शेतकरी आणि व्यापार्‍यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. एकट्या नगर शहरात महावितरणचे प्राथमिक माहितीनुसार 18 लाखांच्या पुढे नुकसान झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता महावितरणाच्या सुत्रांकडून देण्यात आाली. यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हा आकडा 18 ते 20 लाख असून जवळपास महावितरण कंपनीचे 45 ते 45 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

महावितरण कंपनीच्या नगर मंडळ कार्यालयांतर्गत लघुदाब वीज वाहिनीचे 804 तर उच्चदाब वाहिनीचे 502 खांब पडले आहेत. 02 रोहित्र (डीपी) पडले आहेत. या कठीण परिस्थितीत महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता या वरिष्ठ अधिकर्‍यांसह अभियंते व कर्मचारी अथकपणे प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करीत आहेत. सर्वाधिक खांब संगमनेर आणि कर्जत विभागात पडले आहेत.

जिल्ह्यात वादळचा दुसरा मोठा तडाखा जिल्हा परिषदांच्या शाळांना बसला आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यांपैकी सहा तालुक्यांची माहिती शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली असून यात अकोले तालुक्यातील शिंदेवाडी (ब्राम्हणवाडा), कुंभेफळ, पारासूखाडी (रेडी), मेंद्री संगमनेर तालुक्यातील कारमळा शाळेची स्वच्छता गृहाची भिंत, कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शाळा, उक्कडगावची प्राथमिक शाळा, नेवासा तालुक्यातील ताकेवस्ती, पडळी, रिंधे वस्ती शाळा, देडगाव या शाळांचे नुकसान झाले आहे. श्रीरामपूर आणि पारनेर तालुका निरंक असून अजून आठ तालुक्यांतील माहिती संकलित होणे बाकी आहे.

यासह अकोले, संगमनेर, नगर शहर आणि जामखेड तालुक्यांतील खासगी व्यक्तींची घरे, नगर शहरातील अन्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, दुचाकी, चार चाकी वाहनांवर झाडांच्या फांद्या पडून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यात दोन दिवसांत मृगाच्या तडाख्यात जवळपास कोटभर रुपयांचे नुकसान झालेले आहे.

दरम्यान, महसूल विभागाने मंगळवारी सायंकाळी सहा तालुक्यांतील नुकसानीची माहिती दिली. यात संगमनेर तालुक्यात एक बैल आणि सात घरांचे नुकसान झाले असून नगर तालुक्यात वाळकीत घोडके यांच्या घराच्या पत्र्यांसोबत माध्यमिक विद्यालयाच्या खोल्यांची पत्रे उडाली आहेत. तसेच बुर्‍हाणनगर, नारायणडोह, चिंचोडी पाटील येथे विशिष्ट समुदायाच्या घरांची पत्रे उडाली असून नगर शहरात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. राहुरी, बारागाव नांदूर आणि राहुरी बुद्रुक याठिकाणी 7 घरांचे नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यात जवळे, राळेगण थेरपाळ व पिंपळनेर येथे फळबागांचे नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यात 12 गावांत नुकसान झाले असून कर्जत तालुक्यात दोन गायी, 1 बैल आणि शेळ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत.

जिल्ह्यात सर्वच भागात वादळ झालेले नाही. ज्याठिकाणी वादळ होऊन नुकसान झालेले आहे. त्याठिकाणी तहसीलदारांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनामा झाल्यानंतर त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

– राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!