Type to search

Featured सार्वमत

पावसाच्या तोंडावर नगर शहरात पाणीकोंडी !

Share

नाले सफाईचे पितळच उघडे : अनेक ठिकाणी रस्त्यावर गटारीचे पाणी

अहमदनगर (प्रतिनिधी)– पावसाळ्याच्या प्रारंभीच नगर शहरातील नाले सफाईचे पितळ उघडे पडले आहे. पहिल्या दोन पावसात शहरात अनेक ठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर आणि रस्त्यावरून नागरिकांच्या दारापर्यंत पोहचले आहे. शहरात जर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास अनेकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या आठवड्यात नगर शहरात दोन वेळा मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही पावसात नगर शहरातील सखल भागात दरवर्षीप्रमाणे पाणी साचले होते. अनेक ठिकाणी गटारीतील पाणी उफाळून रस्त्यावरून वाहत होते. शहरातील नालेगाव, दिल्ली दरवाजा, कापडबाजार, जुना कोर्ट परिसर या ठिकाणी पाण्याचे तळेच साचले होते. अशी परिस्थिती माळीवाडा, आयुर्वेद कॉर्नर याठिकाणी होती. याठिकाणी साधारण गुडघ्याच्या जवळपास पाणी साचले होते. पाणी निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्याने हा प्रकार घडला होता. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मनपा शहरात मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून नाले सफाई मोहीम राबविते, मग त्याचा उपयोग का होत नाही, असा संतप्त सवाल नगरकरांमधून व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी पावसानंतर दिल्लीगेट परिसर जवळील निलक्रांती चौक ते न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड महाविद्यालय परिसरात गटारी तुंबून पावसाचे साचलेल्या पाण्याची मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी पहाणी केली. यावेळी माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव, मितेश शहा, पुरुषोत्तम सब्बन, राहुल मुथा, मनपाचे इंजिनीयर निंबाळकर, एस.आय.रामदिन, प्रभाग अधिकारी साबळे, केरटेकर संदीप चव्हाण आदी उपस्थित होते. निलक्रांती चौक भागातील गटारी तुंबलेल्या असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास तयार नाही. परिणामी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून हा परिसर जलमय होत आहे. हा प्रमुख रस्ता असल्याने नागरिकांसह महाविद्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर अनेकवेळा लहान-मोठे अपघात देखील घडत आहेत. आयुक्त भालसिंग यांनी या परिसराची पहाणी करून तातडीने संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या व सदर नाल्यांची सफाई करण्याचे निर्देश दिले.

अनेक ठिकाणी रस्तेच नाही
शहरातील पावसाच्या पाण्याच्या प्रश्‍नासोबतच नगर शहरातील रस्त्यांची अवस्था वाईटच आहे. त्यात आता पावसाळा सुरू झाला असून रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठून त्याचा फटका नागरिकांना बसणार आहे. उपनगरात अनेक ठिकाणी रस्तेच नसून पावसाचे पाणी साठून त्या ठिकाणी नागरिकांच्या येण्या-जाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!