बेलपिंपळगाव परिसरात पाऊस; शेतकरी धास्तावला

0
कांद्यावर करपा तर ज्वारीवर चिकटा पडण्याची
शक्यता; हरभर्‍याचेही होणार नुकसान

बेलपिंपळगाव (वार्ताहर)- दोन दिवसात बदलेल्या वातावरणाचा शेतीवर मोठा दुष्परिणाम झाला असून या वातावरणाने शेतकर्‍यांची चिंता वाढवली आहे. दरम्यान काल बेलपिंपळगाव परिसरात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आधीच यावर्षी खूप पाऊस झाल्याने पाऊस नकोसा झालेला असताना हिवाळ्यात झालेल्या या पावसाने शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

या वर्षी नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव, घोगरगाव, जैनपूर, बेलपांढरी, पुनतगाव या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. सगळ्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. यावर्षी ऊस, कांदे, हरभरा, गहू या पिकांची लागवड क्षेत्र वाढले आहे.
अनेक संकटे पार करून कशीबशी लागवडीसाठी शेती तयार करून लागवड केली.

आणि काल मंगळवारी सायंकाळी अचानक वरुण राजाने हलक्या सरींची बरसात केल्याने कांदा लागवड केलेल्या शेतकर्‍यांना नुकसानीची भीती निर्माण झाली आहे. या वातावरणात नवीन कांदे लागवड क्षेत्रात करपा पडणार आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहेत. हरबरा जमिनीतून डोके वर काढत आहे तेच पावसाचे त्यावर आक्रमक झाल्यामुळे सगळे नुकसान होणार आहे, या पावसामुळे ज्वारीवर देखील चिकटा पडणार असल्याचे जुन्या जाणकार शेतकरी बोलताना दिसत होते.

मंगळवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. नागरीकांनी आज हिवाळ्यात पावसाळी वातावरणाचा अनुभव घेतला. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावात माणसांची रेलचेल असते पण मंगळवारी गावात माणसं आली नाहीत. त्यामुळे गावातील अनेक व्यवसायांचे नियोजन कोलमडून गेले. अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठवले नाही. दिवसभर गावात सूर्यदर्शन झाले नाही. बेलपिंपळगावात चहाची पाच-सहा हॉटेल्स आहेत. येथे दररोज मोठी गर्दी होते. मात्र वातावरणामुळे कुणी घराबाहेर न पडल्याने या व्यावसायिकांचा व्यवसाय न झाल्याने नुकसान झाले. घेतलेल्या दुधाचे काय करायचे हा प्रश्‍न त्यांच्यापुढे पडला.

सकाळपासून दोन ते तीन वेळेस हलक्या सरी बरसल्या पण पाचच्या दरम्यान चांगल्या प्रकारे वरूण राजाने हजेरी लावल्याने अनेक नागरिकांची व शेतकर्‍यांनची तारांबळ उडाली.

यावर्षी पाणी पातळी वाढल्याने अनेक शेतकर्‍यांनी कांदा लागवड केली आहे त्यांचं तोंडचे पाणी पळाले आहे. आधीच खरीप हंगामातील पीक हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल आहे. खरिपात पावसाने पीक वाया गेले आता या वातावरणामुळे पीक वाया गेले तर काय करावे हा मोठा प्रश्‍न उपस्थित होणार आहे.

LEAVE A REPLY

*