श्रीरामपूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस

0

विजेच्या झटक्याने अशोक बँकेचे कॉम्प्युटर सर्व्हर जळाले; एकलहरे, भोकर, खोकर परिसरात काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान, 24 तासात नुकसानीचे पंचनामे करा ः जहागीरदार

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – काल दुपारनंतर श्रीरामपूर शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दूरध्वनी व इंटरनेटसेवा काहीकाळ बंद पडल्या होत्या. विजेचा कडकडाट चालू असताना त्याच्या झटक्याने अशोक बँकेतील कॉम्प्युटर सर्व्हर जळाल्याने बँकेचे कामकाज ठप्प झाले.
ग्रामीण भागातील खोकर, भोकर, वडाळा महादेव, टिळकनगर, खंडाळा या ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी काढलेली बाजरी व सोयाबीन झाकली गेली असून उभे पिके पुन्हा पाण्यात सापडली आहेत.
काल दुपारच्या दरम्यान अचानक पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यात जोरदार वारा सुरु झाल्याने विजांचा कडकडाट होऊ लागला. जवळपास कुठे वीज पडली काय असे वाटू लागले. परंतु काही ठिकाणी या विजेच्या आवाजाने किंवा झटक्याने अनेक ठिकाणी नुकसानही झाले. दोन ते अडीच तास सारखा पाऊस सुरु होता.
भोकर वार्ताहरांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक दिवसांच्या खंडानंतर काल अचानक आलेल्या पावसाने खोकर व भोकर शिवारातील शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने बळीराजाच्या आनंदावर विरजन पडताना दिसत होते. ऊस उत्पादक मात्र समाधानी होताना दिसत आहेत.
काही ठिकाणी काढणीला आलेले कापूस, बाजरी व सोयाबीन घरात घेण्याची लगबग सुरू असतानाच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सुरू होणारा पाऊस तीन दिवस लांबला, परंतु या काळात सर्व शेतकर्‍यांना पिके काढणी करणे शक्य झाले नाही. कारण ग्रामीण भागातील महावितरणचे मोठे भारनियमन, एकाच वेळी अनेक ठिकाणी पिके काढणीला असल्याने मजूरांबरोबर मळणी यंत्रांचा तुटवडा त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे खळे अद्याप बाकी आहेत.
परिसरातील बाजरी, कापूस व सोयाबिन काढणीला आहे. हवामान खात्याच्या अंदाजामुळे सर्वत्र धांदल उडाल्याने मजूरीबरोबर मळणी यंत्रांचेही भाव वाढले असतानाच काल शनिवार 7 आक्टोबरच्या सायंकाळी परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले. काहीवेळानंतर कधी संततधार तर कधी सरी वर सरी कोसळत होत्या. त्याचबरोबर गेल्या पावसातून बचावलेले कांदा रोपही नुकसानीला बळी पडणार आहे. कारण गेल्या पावसाने झोडपल्याने विरळ झालेले कांदा रोप आता चिमटायचे काम सुरू असतानाच पुन्हा पाऊस झाल्याने आणखी रोपांचे नुकसान होत आहे.
टिळकनगर वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे वाड्या-वस्त्यांवर धुव्वाधार पाऊस झाल्याने सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली आहे. महसूल प्रशासनाने 24 तासाच्या आत अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत, अन्यथा अधिकार्‍याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा एकलहरे सोसायटीचे अध्यक्ष लालमोहमद जहागीरदार यांनी दिला.
महाराष्ट्राच्या शेती महामंडळाच्या टिळकनगर स्टेट फॉरमिंगच्या एकलहरे गावासह विविध वाड्यावर काल दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत धुव्वाधार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटाने जनावरे आपला जीव मुठीत घेऊन बसल्याचे दिसून येत होते. वादळासह पाऊस सुरू होताच विद्युत पुरवठा खंडित झाला. एकलहरे व परिसरातील घराची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.
महसूल प्रशासनाने पाहणी करून नुकसानीच्या पंचनामे करावे, अशी मागणी एकलहरे येथील प्रगतशील शेतकरी अन्सार जहागीरदार व रिजवान जहागीरदार, एकलहरेच्या सरपंच लक्ष्मी उमाप, उपसरपंच नसीमखातून जहागीरदार, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भालेराव, राजू पटेल, बेबी रावण निकम, गणेश उमाप, यांच्यासह नूरअहेमद शेख, अनिस जहागीरदार, गव्हाणे, फतरु रोशन, महंमद आजम, राजू वहाब, ताज पटेल, अकबर पटेल, दीपक शितोडे, मुन्ना जहागीरदार, नुरमोहमद सय्यद, संतोष पांढरे, तुषार महाले, बाबा भालेराव आदींनी केली आहे.

नांदूरमध्ये वीज पडून दोन जनावरे दगावली- नांदूर (वार्ताहर) – काल शनिवारी दुपारी झालेल्या विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने राहाता तालुक्यातील नांदूर येथे वीज पडून दोन जनावरे दगावल्याची घटना घडली. नांदूर येथील शेत जमीन गट नंबर -43 येथील राहणारे बाळासाहेब आनंदराव जगताप यांच्या घराशेजारी अचानक मोठा आवाज होऊन घराशेजारी बांधलेल्या गोठ्यावर वीज पडली. त्यात एक म्हैस व दादासाहेब लहानू काबरे यांची चरण्यासाठी बांधलेली सहा महिन्याची गाय जागीच ठार झाली. जगताप यांच्या इतर दोन गायी जखमी होऊन अर्धांगवायू झाल्याप्रमाणे अस्वस्थ आहे. याबाबतची माहिती तलाठी कार्यालयामार्फत राहाता तहसीलला पाठविण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना कळविण्यात आले. मात्र ते निवडणूक कामात व्यस्त असल्याने ते पंचनामा करण्यास पोहचू शकले नाही, असे जगताप यांनी सांगितले.

दूरसंचारच्या कार्यालयावर विजेचा झटका- श्रीरामपूर येथील भारत संचार निगम कार्यालयावर वीज रोधक असल्याने परिसरातील हानी टळली. शहरात जोरात विजेचा कडकडाट झाला. त्यावेळी येथील भारत संचार निगमच्या कार्यालयावर बसविलेल्या विजरोधकाने वीज खेचण्याचे काम केले. कार्यालयावर जवळ जवळ 7 ते 8 वीज रोधक बसविले आहे. त्यावेळी 2 ते 3  रोधक वीज चमकल्यावर वाकून गेले व जमिनीत आर्थिगद्वारे वीज पोहच केली. त्यावेळी परिसरात मोठा आवाज झाला व कार्यालयातील विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे कार्यालयातील इलेक्ट्रीक कार्डचे नुकसान झाले. त्यामुळे बराच वेळ टेलिफोन व मोबाईल सुविधा विस्कळीत झाली होती. त्वरित दखल घेतल्याने सुविधा सुरळीत करण्यात यश आले.

  शहरातील अशोक सहकारी बँकेचे कामकाज चालू असताना पावसाचा जोर वाढत होता. तसेच विजांचा मोठमोठ्याने कडकडाट सुरु होता. जोरदार आवाज होवून कुठेतरी विज पडली असावी असा आवाज झाला. त्याच्या झटक्याने अशोक बँकेत असलेला कॉम्प्युटरचा सर्व्हर जळला. यामुळे संपूर्ण सिस्टमच जळाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अशोक बँकेशेजारी व परिसरात असलेल्या दुकानातील विजेचे तसेच इलेक्ट्रॉनक साहित्य जळून खाक झाली आहेत. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये घबराहट सुरु होती.

LEAVE A REPLY

*