नाशकात 2 पेट्रोल पंपांवर छापे; चीपद्वारे चोरीचा संशय; जिल्ह्यातील २७ पंप रडावर

0

नाशिक । दि. 23 प्रतिनिधी – पेट्रोल पंपावरील मशिनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप बसून इंधन चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर देशभर पंपांवर छापे घातले जात असून यात काल रात्री नाशिक शहरातील त्र्यंबक नाका भागातील एका पंपावर पथकाने छापा घालत पंप सील केला. याठिकाणी मशीन सदोष आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

तसेच दिंडोरी नाका भागात दुसर्‍या एका पंपाची चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील एकूण 28 पंपाची तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मात्र यासंदर्भात पुरवठा विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांत मोठी खळबळ उडाली आहे.

इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेल चोरी करणारे रॅकेट पकडण्यात आल्यानंतर याच रॅकटेमधील सहा जणांना ठाणे शहर क्राईम ब्रॅचने अटक केली आहे.

त्यांच्याकडून राज्यातील काही जिल्ह्यात पेट्रोल पंपावर इलेक्ट्रॉनिक्स चीप बसवण्यात आल्या. त्यांची यादी ठाणे क्राईम ब्रॅचकडे असून या यादीत नाशिक जिल्ह्यातील 28 पेट्रोल पंपाची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या यादीनुसार जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर धाडी टाकल्या जात आहे. यानुसार आज सायंकाळी त्र्यंबकनाका भागात ठाणे क्राईम बँच, वैधमापन विभाग, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी अधिकारी आणि जिल्हा पुरवठा विभाग यांनी संयुक्तरित्या जे. आर. मेहता अ‍ॅण्ड सन्स या पेट्रोल पंपावर छापा टाकला. यावेळी पेट्रोल पंपावरील सर्व मशिनची तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली.

यात दोन मशीन सदोष असल्याचे आढळून आले. यात एका मशिनमधून प्रति लिटर मागे 35 मि. लि. व दुसर्‍या मशीनमधून 25 मि. लि. पेट्रोल कमी येत असल्याचे तपासणीत आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशाप्रकारे मशीन सदोष आढळून आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती, त्यानंतर पथकाने हा पंप सील केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उत्तरप्रदेशमध्ये पेट्रोलपंपावर चीप आणि रिमोटच्या सहाय्याने होणार्‍या पेट्रोल चोरीचे कनेक्शन उघडकीस आल्यानंतर राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिले होते.

या पार्श्वभूमीवर ठाणे क्राईम ब्रँच, वैधमापन विभाग आणि जिल्हा पुरवठा विभागाने आज सायंकाळी दोन ठिकाणी धाड सत्र सुरू करत पेट्रोल पंपाची तपासणी सुरू केली.

आजवर राज्यातील 1636 पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या तपासणीत 11 हजार 418 पंपांची तपासणी करण्यात आली आहे. यात 252 पंपाद्वारे कमी-जास्त प्रमाणात वितरण होत असल्याचे आढळून आले आहे.

नाशिक विभागात 322 वितरकांची चौकशी करून 2 हजार पंप तपासण्यात आले आहे. यात 2 पंप दोषी आढळल्याने बंद करण्यात आले असून त्यांच्यावर खटला दाखल केला आहे. आजच्या कारवाईत आणखी दोन पंपांची भर पडली आहे.

दोन पंप सील

दोन दिवसांपूर्वी नाशिक- चांदवड महामार्गावरील 2 पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली होती. यात प्रत्येकी 5 लिटरमागे 200 मिली पेट्रोलची चोरी केली जात असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी दोन पंप सील करण्यात आले आहे. आज रात्री त्र्यंबकनाका भागातील पंपही सहल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*