राहुरीत रेल्वे भूयारी मार्गाला खासदार गांधींच्या अट्टाहासाचा ‘कोलदांडा’

0

ग्रामस्थांचा संताप भूयारी मार्गाचा प्रश्‍न रखडण्याच्या मार्गावर

राहुरी स्टेशन (वार्ताहर) – राहुरी येथील रेल्वेस्टेशन नजिक भूयारी मार्ग करण्याचे ठोस आश्‍वासन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले. मात्र, भूयारी मार्गाऐवजी उड्डाणपूल करा, असा अट्टाहास नगर दक्षिणचे खासदार दिलीप गांधी यांनी धरल्यामुळे भूयारी मार्गाला खासदार गांधी यांचा ‘कोलदांडा’ बसला आहे.
त्यामुळे आता भूयारी मार्गाचेही काम रखडणार असल्याने राहुरीच्या पूर्व भागातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांना उड्डाणपुलाचे ‘गाजर’ दाखवून खासदार गांधी यांनी गेल्या 25 वर्षांपासून भूयारी मार्गासाठी आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे.
राहुरी रेल्वेस्टेशन येथे भूयारी मार्ग होण्यासाठी राहुरीच्या पूर्व भागातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून आंदोलनाची भूमिका घेतली आहे. अनेकदा आंदोलन केल्याने त्याच्या दणक्याने सोलापूर येथील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन भूयारी मार्ग करण्याच्या मागणीला ‘ग्रीन सिग्नल’ दाखविला होता.
त्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी ग्रामस्थांसमवेत तीनदा बैठका घेतल्या. बैठकीत या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात आला. भूयारी मार्ग करण्यासाठी रेल्वेगेटजवळ जागाही निश्‍चित करण्यात आली. त्या जागेची पाहणी करून वरिष्ठ अधिकार्‍यांनी भूयारी मार्गाला संमतीही दिली. मात्र, खासदार गांधी यांनी या भूयारी मार्गाला विरोध करून उड्डाणपुलाचे आपले घोडे पुढे दामटले.
त्यामुळे भूयारी मार्ग की उड्डाणपूल? या चक्रव्युहात सापडलेल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रश्‍नाकडे आता सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
खासदार गांधी यांना ग्रामस्थांनी अनेकदा याप्रश्‍नी साकडे घातले. मात्र, त्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, रेल्वेरूळाखालून जाणार्‍या मोरीची स्वच्छता करण्याचे आश्‍वासन खा. गांधी यांनी ग्रामस्थांना दिले होते. मात्र, त्याकडे खा. गांधी यांनी दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.
रेल्वेस्टेशननजिक असलेले रेल्वेगेट अनेकदा बंद होत असल्याने त्याचा मोठा अडसर राहुरीच्या पूर्व भागातील ग्रामस्थांना होत आहे. त्यासाठी भूयारी मार्ग करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. रेल्वेगेटमुळे अनेक रुग्ण अत्यवस्थ झाले, काही महिलाही वाहनातच वेळेवर आरोग्यसेवा न मिळाल्याने प्रसूत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेेत.
तर काही शेतकर्‍यांचा शेतमाल वेळेवर न गेल्याने त्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यासाठी भूयारी मार्ग हा त्यावर पर्याय ग्रामस्थांनी शोधला होता. मात्र, तेथेही खा. गांधी यांनी आडकाठी आणल्याने ग्रामस्थांनी खा. गांधी यांना जाब विचारण्याचा पवित्रा घेतला आहे.

 

LEAVE A REPLY

*