राहुरी तालुक्यात रब्बीचाही पेरा सुरू

0

24447 हेक्टरचे उद्दिष्ट; 25 टक्के ऊस लागवड पूर्ण; ज्वारीने उद्दिष्टाची सरासरी ओलांडली

राहुरी (प्रतिनिधी)– राहुरी तालुका माहेरघर असलेले मुळाधरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले. त्यातच जलयुक्त शिवार मोहिमेअंतर्गत बंधारे व तळे तुडूंब भरल्याने यावर्षी राहुरी तालुक्यात शेतीसिंचन शाश्‍वत बनले आहे.
पर्यायाने शाश्‍वत सिंचनाचा ‘रब्बीला भरवसा हाय’ म्हणूनच आता रब्बी हंगामही तालुक्यात यशस्वी होणार असल्याचे कृषी विभागाने सांगीतले. त्यामुुळे खरिपात उत्स्फूर्तपणे पेरणी करून उद्दिष्टापेक्षा 5 टक्के अधिक म्हणजेच 105 टक्के खरिपाची पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांनी यंदा रब्बीसाठीही बाह्या सरसावल्या आहेत.तालुक्यात एकूण 24 हजार 447 हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट्य कृषी विभागाच्या अहवालात देण्यात आले आहे.
उसाची 9 हजार 800 हेक्टर क्षेत्रातील उद्दिष्टापैकी 2 हजार 441 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 25 टक्के ऊस लागवड पूर्ण झाली आहे. यंदा पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये डॉ. तनपुरे कारखाना सुरू होणार असल्याने ऊस लागवडीचा आलेख उंचावणार असल्याचे संकेत आहेत. तर ज्वारी पिकासाठी सरासरी 11 हजार 110 हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट्य असताना 1810 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी पूर्ण होऊन यंदा ज्वारीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे.
मात्र, 105 टक्के खरिपाची पेरणी झाल्यानंतर मुसळधार पावसाने कपाशी, सोयाबीन, कांदा, घास या पिकांची पुरती वाताहात पहायला मिळाली. त्यामुळे आता खरिपाने तोंड पोळालेले शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी ताकही फुंकून पिण्याच्या मनःस्थितीत आहेत. पाण्याची शाश्‍वती असली तरी भारनियमनाचा मोठा फटका बसणार असल्याच्या कल्पनेने ज्वारी वगळता इतर पिकांची लागवड मंदगतीने सुरू आहे. मात्र, दिवाळसणानंतर रब्बी पिकांच्या लागवडीचा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा या दोन्ही धरणांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा आहे. तालुक्यातील अनेक गावतळे, बंधारे, ओढे, नाले, कूपनलिका, विहिरी तुडूंब भरलेल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न यंदाही मार्गी लागणार आहे. मात्र, परतीचा मान्सून आणि अवकाळीची शक्यता, त्यातच हवामान खात्याने अतिवृष्टीचा दिलेला इशारा यामुळे कापूस व सोयाबीन पिके संकटात सापडली आहेत.
शनिवारी झालेल्या पावसाने राहुरी तालुक्यातील कपाशी, सोयाबीनचे पीक भूईसपाट झाले आहे. बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा तयार कापूस पावसाच्या पाण्यामुळे भिजून शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. रब्बी पिकांच्या पेरण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये उत्साह असला सरकारी धोरणांकडे शेतकर्‍यांचे लक्ष आहे. खरीप हंगामात राहुरी भागात ऊस व कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली.
तर बाजरी, सोयाबीन पिकाचेही अधिक उत्पादन शेतकर्‍यांनी घेतले. मात्र, मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात राहुरी भागातील शेतकर्‍यांचे कापूस, बाजरी, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. मुसळधार पावसाने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण होऊन ओढे, नाले, नद्या दुधडी भरून वाहू लागल्या होत्या. तर शेतातही पाणी साचून शेतीला शेततळ्यांचे स्वरूप आले आहे.
काही गावांतील शेतांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरण्यांसाठी शेतकर्‍यांना वापसा येण्याची वाट पहावी लागणार आहे. काही ठिकाणी जमिनी वापशावर असून काही दिवाळीनंतरच वापशावर आलेल्या जमिनीत रब्बीचा पेरा हाती घेण्याची तयारी शेतकर्‍यांनी दर्शविली आहे.

  कृषी विभागाने घेतलेल्या नियोजनात 24 हजार 447 हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांसाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. यामध्ये ज्वारी, गहू, मका, तृणधान्य, हरभरा, कडधान्य, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांची लगीनघाई सुरू झाली आहे. राहुरी तालुक्यात गहू पिकासाठी 6396 हेक्टर क्षेत्र ग्राह्य धरण्यात आले आहे. मका पिकासाठी 692 हेक्टर क्षेत्र असून 94 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभरा पिकासाठी 5995 हेक्टर क्षेत्र असून 278 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. करडई, जवस, तीळ, सुर्यफूल पिकासाठी 144 हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे.  तर चारा पिकांसाठी 1342 हेक्टर क्षेत्र, कांदा पीक 1 हजार 438 हेक्टर क्षेत्र, भाजीपाला पिकासाठी 154 हेक्टर क्षेत्र, फळपिकासाठी 1130 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिके घेण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

LEAVE A REPLY

*