राहुरीत रस्ता लुटारूंची टोळी गजाआड

0

गावठी कट्टा, जिवंत काडतूसे, वाहने हस्तगत; खडांबे शिवारात मध्यरात्रीची कारवाई; शिंगवे, देहरे येथील तरुणांचा समावेश

राहुरी (प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसापासून रस्तालूट करून जिल्ह्यात दहशत निर्माण करणार्‍या व पोलिसांच्या रडारवर असलेल्या सहा अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या राहुरी पोलिसांनी आवळल्या. राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली.
या टोळीकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूसे व इतर हत्यारे हस्तगत करण्यात आली असून त्यांना जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांंना यश आले आहे. राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारात बुधवारी (दि. 21) मध्यरात्रीनंतर 1 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याने अनेक गुन्ह्यांचा तपास लागणार असल्याची माहिती पोनि. वाघ यांनी दिली आहे.
पो. नि. वाघ यांना गोपनीयरित्या मिळालेल्या माहितीवरून राहुरी, शिर्डी, राहाता, लोणी, नगर एमआयडीसी, पोलीस ठाण्यात रस्तालुटीसह इतर गुन्हे दाखल असलेली रस्तालूट करणारी टोळी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून राहुरी हद्दीतील वांबोरी येथे लुटमार करणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी आपला फौजफाटा बरोबर घेऊन राहुरी तालुक्यातील खडांबा शिवारात देवनदीच्या पुलाजवळ टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला होता.
मध्यरात्रीनंतर एक संशयितरित्या आलेली आरोपींची चारचाकी स्कर्पिओ व विनानंबरची दुचाकी गाडी दिसताच त्यांना थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला. मात्र, पोलिसांना पाहताच ते न थांबताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी पाठलाग करून या टोळीला वाहनांसह जेरबंद केले. पकडलेल्या आरोपींमध्ये अट्टल दरोडेखोर बाळासाहेब उर्फ बल्ल्या भाऊसाहेब साळवे, हा व त्याचे साथीदार शंकर शामराव काळे, योगेश राजेंद्र जाधव, संदीप सुभाष नागुडे, रामनाथ शामराव मोरे (सर्व रा.शिंगवे), रूपेश बाळासाहेब लांडगे (रा.देहरे) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
या टोळीने गेल्या अनेक दिवसाुपासून रस्तालूट करत धुमाकूळ घातला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूसे, लाकडी दांडके, मिरचीची पूड, स्कॉर्पिओ क्रमांक एमएच 16 एबी 7474 व विना नंबरची काळ्या रंगाच्या पल्सरसह सहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
या धाडसी कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.दिलीप राठोड, पो.उप.नि.लक्ष्मण भोसले, परीविक्षाधीन पो.उप.नि.दत्तात्रय उजे, सहा.फौ.प्रभाकर तोडकरी, हेडकॉन्स्टेबल शैलेश सरोदे, पो हेड.कॉ.शंकर रोकडे, पो.कॉ.नवनाथ वाघमोडे, पो.कॉ.बंडू बहीर, पो.कॉ.सुशांत दिवटे, पो.कॉ.अनिल पवार, पो.कॉ.भैरवनाथ अडागळे, पो.कॉ.लाला पटेल, आदींचा समावेश होता. दरम्यान, आठवडाभरात पो.नि.प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखालील राहुरी पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी पिंप्री अवघड शिवारात रस्तालूट करणार्‍या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आता ही दुसरी कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली आहे.

 

LEAVE A REPLY

*