Type to search

Featured सार्वमत

राहुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्यसेवा अद्यापही ‘कोमात’

Share

तालुक्यातील 35 टक्के पदे रिक्तच; सात्रळच्या नवीन केंद्राला मंजुरी

राहुरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन भलेही राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला आर्थिक ‘टॉनिक’ देत असले तरी राहुरी तालुक्यात मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा अद्यापही ‘कोमात’च राहिली आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये सात उपकेंद्रे असतानाच आता सात्रळ येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाल्याने म्हैसगावसह आठव्या केंद्राची भर पडली आहे. मात्र, आरोग्य विभागांतर्गत तालुक्यातील मंजूर पदांपैकी 35 टक्के पदे रिक्त असल्याने केंद्र मंजूर होतात, पण रिक्त पदांमुळे रुग्णसेवेचा खेळखंडोबा होतो.

तालुक्यातील बहुतांशी प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘सलाईन’वर असताना मंजुरी देऊन त्या केंद्रांकडे आरोग्य प्रशासन पाठ फिरवीत असल्याने तालुक्यातील आरोग्य सेवा कोलमडली असल्याचा नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. राहुरी तालुक्यात एकूण 6 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 37 उपकेंद्रे आहेत. म्हैसगाव येथील प्राथमिक केंद्र पूर्णावस्थेत आहे. मात्र, त्याला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. सात्रळ येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र होणार असून तालुक्यात आता आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे ग्रामीण भागात रुग्णसेवा मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतून सात्रळला 6 कोटी 73 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

त्यानुसार सात्रळ येथे लवकरच नवीन इमारत व निवासस्थानाचे काम सुरू होणार आहे. राहुरी पंचायत समितीने सात्रळसह डिग्रस येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तर चेडगाव, गोटुंबा आखाडा, वाघाचा आखाडा या ठिकाणी उपकेंद्रांची मागणी केलेली आहे. असे असले तरी तालुक्यातील 6 आरोग्य केंद्रे व 37 उपकेंद्रांसाठी आरोग्य अधिकारी या पदापासून आरोग्य पर्यवेक्षक, सेवक-सेविका, सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचर अशा 176 विविध पदांना मंजुरी दिलेली होती. यापैकी 50-55 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची आग्रही मागणीही सातत्याने होत आहे. मात्र, शासन स्तरावर त्याला फारसे कोणी गांभर्यीाने घेतले नसल्याने प्रतिसाद मिळत नाही.

एकीकडे ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य केंद्रांद्वारे वैद्यकीय सेवा सुविधा देण्याबाबत शासन आग्रही असते. दरवर्षी नवीन आरोग्य केंद्र मंजूर होतात. आर्थिक रसद देऊन ती बांधली जातात. मात्र, त्यांना देण्यात येणार्‍या सुविधा, सोई तसेच मंजूर केलेली पदे देण्याबाबत उदासीनता आणि आडमुठेपणाचे धोरण ठेवले जाते. यामुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा कोलमडून पडतात. शासनाने चांगली सेवा देण्यासाठी त्यातील त्रुटी शोधून मार्ग काढावा, अशी अपेक्षा रुग्णांनी व्यक्त केली आहे.

राहुरी शहरात ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आलेले आहे. मात्र, ते आता शेवटच्या घटका मोजत आहे. इमारत पूर्णपणे मोडकळीस आल्याने सध्या आरोग्य सेवेचे कामकाज अन्य इमारतीत सुरू करण्यात आले आहे. ताहाराबाद, देवळाली प्रवरा, टाकळीमिया, मांजरी, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सतत औषधांचा तुटवडा, तर उंबरे आरोग्य केंद्रात कर्मचार्‍यांचा तुटवडा पडतो. ताहाराबादला केवळ इमारत बांधण्यात आली. मात्र, तेथे व देवळाली प्रवरा येथे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचा नाराजीचा सूर रुग्णांमधून उमटतो आहे. त्यामुळे एकंदरीत राहुरी तालुक्यात आता आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे असले तरी रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळण्याची माफक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

राहुरी तालुक्यात सध्या सहा गावांत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर 37 उपकेंद्र आहेत. या सर्व आरोग्य केंद्रांत स्वच्छतेबाबत संबंधितांची उदासीनता चव्हाट्यावर येत आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव, आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकार्‍यांची रुग्णांबरोबर असलेली अरेरावीची वागणूक, आरोग्य सेवेत कामचुकारपणा यामुळे या आरोग्य केंद्रांच्या वाढलेल्या दुखण्यांवर तातडीने ‘मलमपट्टी’ करणे गरजेचे बनले आहे.

बारागाव नांदूर येथील प्रा. आरोग्य केंद्र सध्या शाळेच्या खोलीत सुरू आहे. तेथील इमारत भेगाळल्यामुळे ही इमारत बंद करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी 3 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून निविदाही निघाल्या आहेत. लवकरच इमारत पाडून नवीन इमारतीच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.

बहुतांशी आरोग्य केंद्रांच्या जवळपास वापरलेले इंजेक्शन, जखमेवरील वापरलेल्या मलमपट्ट्या, सलाईनच्या व औषधांच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला आढळून येतो. त्यामुळे स्वच्छतेला राहुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!