राहुरीत कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडला

0

2700 रुपये भाव मिळाल्याने लिलाव पुन्हा सुरळीत; सभापती अरूण तनपुरेंची यशस्वी मध्यस्थी!

 

राहुरी ़(तालुका प्रतिनिधी) – कांद्याला भाव कमी आल्याने संतप्त शेतकर्‍यांनी काल ‘कांदा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा’ अशी जोरदार घोषणाबाजी करीत राहुरी बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडले. समितीचे सभापती अरूण तनपुरे व शेतकर्‍यांनी एकत्रित बाजारभावावर चर्चा केली.

 

 

राहुरी बाजार समितीतील कांदा लिलाव काल शुक्रवारी (दि.04) सकाळी दहा वाजता सुरू झाले. प्रतीक्विंटल 2 हजार 400 रुपये भाव निघताच कांदा विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडत नगर-मनमाड महामार्गावर ठिय्या दिला. दोन दिवसांपूर्वी बाजार समितीतील कांदा लिलावात 2 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल भाव निघाला होता

 

 

. गुरूवारी (दि. 03) नगर बाजार समितीतील कांदा लिलावात 3 हजार 500 रुपयांपर्यंत भाव निघाल्याने काल राहुरी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. बाजार समितीत तब्बल 50 हजार गोण्या कांद्याची विक्रमी आवक झाली. राहुरीसह संगमनेर, वैजापूर, श्रीरामपूर आदी ठिकाणच्या शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता.

 

 

शेतकरी रस्त्यावर उतरताच महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच पो.नि.प्रमोद वाघ यांनी शेतकर्‍यांना, रस्त्यावर थांबू नये, आपल्या ज्या मागण्या असतील त्या बाजार समिती प्रशासनाशी बोलून तोडगा काढा, कायदा हातात घेवू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा देताच शेतकरी बाजार समिती आवारात घोषणाबाजी करत आले.

 

 

बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी यावेळी शेतकर्‍यांशी चर्चा केली. तसेच बाहेरील बाजार समित्यांमधे निघालेल्या बाजारभावाची माहिती देत वास्तविक परिस्थिती समजावून दिली. मात्र, शेतकर्‍यांचे समाधान झाले नाही. बाहेरील बाजार समितीत 3 हजार 500 रुपये भाव मिळाला असून येथे किमान 3000 ते 3200 रुपये भाव मिळाला पाहिजे, या भुमिकेवर शेतकरी ठाम राहिल्याने गोंधळाची स्थिती कायम राहिली.

 

 

प्रारंभी कांदा उत्पादकांना चांगल्या दर्जाच्या कांद्याला लिलावात 2400 रुपये भाव देण्यात आला. मात्र, 3 हजार रुपयांच्या पुढे कांद्याचे भाव गेल्याचे सांगून संतप्त शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले. यावर सभापती अरूण तनपुरे यांनी तोडगा काढून आडत्यांंना पुन्हा फेरलिलाव करण्याच्या सूचना दिल्या. फेरलिलावात चांगल्या प्रतिच्या कांद्याला 2700 रुपये भाव मिळाला. त्यामुळे प्रतिक्विंटल 300 रुपये भाववाढ मिळाल्याने आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांचे समाधान झाल्याने कांद्याचे लिलाव पुन्हा सुरळीत सुरू झाले.

LEAVE A REPLY

*